महायुतीत संघर्ष पेटला! गणेश नाईकांचे 'ते' व्हिडिओ महाराष्ट्रात प्रदर्शित करू; शिंदेसेनेचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2025 08:15 IST2025-10-05T08:10:15+5:302025-10-05T08:15:01+5:30
नवी मुंबईचे राजे म्हणवणाऱ्या गणेश नाईक यांची यामुळे जळफळाट होत असून शिंदेंविरोधात ते रोज बेताल वक्तव्ये करीत आहेत. यापुढे जर अशी वक्तव्ये केली तर त्याच भाषेत सर्वसामान्य शिवसैनिक उत्तर देतील असं शिंदेसेना प्रवक्ते खासदार नरेश म्हस्के यांनी म्हटलं.

महायुतीत संघर्ष पेटला! गणेश नाईकांचे 'ते' व्हिडिओ महाराष्ट्रात प्रदर्शित करू; शिंदेसेनेचा इशारा
मुंबई - नवी मुंबईत १४ गावांच्या समावेशावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री गणेश नाईक यांच्यातील संघर्ष वाढला आहे. नालायक लोकांच्या हाती सत्ता देऊ नका, नाहीतर शहराचे वाटोळे होईल असं विधान करत नाईकांनी अप्रत्यक्षपणे शिंदेवर निशाणा साधला. त्यावर आता शिंदेसेनेचे नेते संतापले आहेत. आमच्या नेत्यांना गणेश नाईक तुम्ही नालायक म्हणत अहात. मात्र नालायकपणाची एक व्याख्या असते. तुमच्या नालायकपणाचे व्हिडीओ नवी मुंबईच्या गल्लीत पूर्वी फिरत होते. नंतर ते व्हिडीओ फेसबुक आणि व्हाट्स अपच्या माध्यमातून महाराष्ट्रात गाजले. भविष्यात हेच व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रातील चित्रपटगृहात प्रदर्शित केले जातील असा इशारा शिंदेसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी दिले आहेत.
नवी मुंबईतील पदाधिकाऱ्यांसोबत खासदार नरेश म्हस्के यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यात गणेश नाईकांवर प्रहार करण्यात आले. नवी मुंबईतील भूमीपुत्र, माथाडी कामगार आणि झोपडपट्टीधारकांना मोफत घरे मिळण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाढीव एफएसआय दिला. नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट झालेल्या १४ गावांसाठी ७० कोटींचा निधी शासन देणार असून अवघ्या काही वर्षातच नवी मुंबईकरांच्या दारात विकासाची गंगा शिंदेंनी आणली आहे. नवी मुंबईचे राजे म्हणवणाऱ्या गणेश नाईक यांची यामुळे जळफळाट होत असून शिंदेंविरोधात ते रोज बेताल वक्तव्ये करीत आहेत. यापुढे जर अशी वक्तव्ये केली तर त्याच भाषेत सर्वसामान्य शिवसैनिक उत्तर देतील असं शिंदेसेना प्रवक्ते खासदार नरेश म्हस्के यांनी म्हटलं.
तसेच राज्यात महायुतीचे सरकार आहे तरीही सातत्याने गणेश नाईक हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात बेताल वक्तव्ये करत आहेत. दिशाभूल करणारी माहिती पसरवत आहेत. नवी मुंबईमध्ये घराणेशाही लादणाऱ्या गणेश नाईक यांनी नवी मुंबईकरांना गेली अनेक वर्ष नागरी सुविधांपासून वंचित ठेवले आहे. सत्तेत असूनही नागरिकांचे कोणतेच प्रश्न मार्गी लावलेले नाहीत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नवी मुंबईकरांनी गाऱ्हाणे घातले. त्याला एकनाथ शिंदे यांनी यांनी प्रतिसाद दिला. नवी मुंबईतील नागरिकांना अधिक चांगली घरे, योग्य पायाभूत सुविधा मिळाव्यात यासाठी एफएसआय वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी हा निर्णय नागरिकांच्या हितासाठी घेतला तरीही यावर आक्षेप असणे दुर्दैवी आहे. नवी मुंबईतील घरे सिडकोने बांधली आहेत. आता त्यातील काही इमारती जुन्या झाल्या आहेत. वाढीव एफएसआयमुळे पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. स्थानिक भूमीपुत्र, माथाडी कामगार, झोपडपट्टीधारकांनी गरजेपोटी वाढीव बांधकाम केले आहे. वाढीव एफएसआयमुळे मोठी व मोफत घरे नवी मुंबईकरांना मिळणार आहे. मात्र येथील जनता आता गणेश नाईक यांच्या बिल्डर लॉबीला भीक घालत नसल्याने त्यांची चिडचिड होत असल्याचा आरोप खासदार नरेश म्हस्के यांनी केला आहे.
दरम्यान, १४ गावांच्या समावेशाबाबत मूळ प्रस्ताव गणेश नाईकांचाच होता. आता त्यावर ते आक्षेप घेत आहेत. कोविडमुळे नवी मुंबई महापालिकेची आर्थिक घडी विस्कटली, त्यासाठी एकनाथ शिंदे भरीव निधी देत आहेत. रस्ते, उड्डाणपूल बांधले जात आहेत. गणेश नाईक पालकमंत्री असताना हे निर्णय का घेतले नाहीत? आज जनतेच्या हिताचे निर्णय होताना शिंदेंवर टीका सुरू आहे. एकनाथ शिंदे हे केवळ खुर्चीपुरते सीमित नसलेले तर रस्त्यावर उतरून जनतेसाठी लढणारे नेतृत्व आहे. शिंदेंनी घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयांमुळेच काहींना अनेक वर्षांनी मंत्रिपद मिळाले हे विसरून चालणार नाही. आमच्या नेत्यांना तुम्ही नालायक म्हणणार असाल तर तुमच्या नालायकपणाचे व्हिडिओ व्हाट्सएपचे पुरावे जे नवी मुंबईत फिरत होते ते भविष्यात महाराष्ट्रातील चित्रपटगृहात येतील असा इशारा शिंदेसेनेने दिला.