“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2025 14:32 IST2025-09-28T14:30:53+5:302025-09-28T14:32:45+5:30
CM Devendra Fadnavis PC News: सोलापूर आणि मराठवाड्यातील जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाच्या सूचना केल्या.

“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
CM Devendra Fadnavis PC News: आज आणि उद्याचा दिवस चिंताजनक आहे. त्यानंतर कमी दाबाचा पट्टा जो तयार झाला आहे, तो कमी होत जाणार आहे. त्यानंतर परतीचा पाऊस असेल. पुढील दोन, तीन दिवस अलर्ट मोडवर राहून कोणत्याही प्रकारची हानी होणार नाही किंवा कमीत कमी हानी होईल. अशा प्रकारची व्यवस्था करायला आपण सांगितली आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. अतिवृष्टीचा इशारा, पुन्हा सुरू झालेला मोठा पाऊस आणि काही ठिकाणी कायम असलेली पूरस्थिती याचा आढावा देवेंद्र फडणवीस यांनी घेतला. याबाबत पत्रकारांना माहिती दिली.
पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, सकाळपासून मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क करून चर्चा केली आहे. सोलापूरच्या जिल्ह्याधिकाऱ्यांशीही चर्चा केली आहे. मदत आणि पुनर्वसन यासंदर्भात ज्या उपाययोजना आपण केलेल्या आहेत, त्याच्या सूचना दिलेल्या आहेत. विशेषतः ज्या लोकांना आपण पुनर्वसन केंद्रात हलवले आहे, त्यांच्या जेवणाची उत्तम सोय झाली पाहिजे, पिण्याचे पाणी असले पाहिजे. याचसोबत काही ठिकाणी जनावरांच्या चाऱ्यासंदर्भात प्रश्न निर्माण झालेला आहे. त्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले आहे की, तत्काळ चारा घेऊन, जनावरांसाठी चाऱ्याचा पुरवठा करण्यासंदर्भात व्यवस्था आपण केली आहे, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
देवेंद्र फडणवीस यांच्या महत्त्वाच्या सूचना
आपण जे २ हजार कोटी रुपये वितरीत केले आहेत, त्याचे वाटप सुरू केले आहे. यासोबत घरांमध्ये पाणी शिरले आहे, त्याचे तातडीचे १० हजार रुपये देण्याची सुरुवात आपण केलेली आहे. ठिकठिकाणी लोकांना रेशन कीट देण्यास सुरुवात झालेली आहे. अन्न-धान्य देण्याची सुरुवात केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांना स्पष्टपणे सांगितले आहे की, खालची यंत्रणा योग्य प्रकारे काम करत आहे की नाही ते पाहावे. फिल्डवर राहा. मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे. त्याचा अंदाज घेऊन धोकादायक ठिकाणी असलेल्या लोकांना पहिल्यांना तेथून सुरक्षित ठिकाणी हलवावे, अशा सूचना देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या.
दरम्यान, हे सगळे होत असताना लोकांना जी काही मदत करायची आहे, ती जास्तीत जास्त करण्याची सरकारची मानसिकता आहे. हेदेखील सांगितले आहे की, सरसकट पंचनामे करावेत. कुठेही फार कायदा आणि नियमांवर बोट ठेवून लोकांना त्रास होईल, असे वागू नका. एकूण सगळ्या नुकसानीची माहिती आमच्याकडे आल्यानंतर अधिकची काय मदत करायची आहे, त्याचा निर्णय सरकार करेल, असे देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टपणे सांगितले.