Rahimatpur News: ऐतिहासिक संदर्भ असलेल्या सातारा जिल्ह्यातील एका गावाचे नामांतर करण्याचा मुद्दा आता चर्चेत आला आहे. कोरेगाव तालुक्यात असलेल्या रहिमतपूर गावाचे नामांतर करण्याची मागणी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे करण्यात आली. त्यावर रहिमतपूरचे रघुनाथपूर असे नामांतर केले जाईल, अशी घोषणा बावनकुळे यांनी केली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यात रहिमतपूर हे गाव आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांच्यासमोर रहिमतपूर गावाच्या नामांतराचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून रघुनाथपूर असे नामांतर केले जाईल, काळजी करू नका, असा शब्द बावनकुळेंनी उपस्थितांना दिला.
छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर नंतर आता रघुनाथपूरचे नामांतर होणार
कराड येथे एका कार्यक्रमात चंद्रशेखर बावनकुळे यांनी रहिमतपूरच्या नामांतराचा मुद्द्यावर भाष्य केले.
"रहिमतपूर या गावाचं नामांतर रघुनाथपूर व्हावं, अशी मागणी माझ्याकडे करण्यात आली आहे. रहिमतपूरचं रघुनाथपूर... आपण औरंगाबादचं संभाजीनगर केलं. अहमदनगरचं अहिल्यानगर केलं. आजचं मी मुख्यमंत्र्यांशी बोलेन. रहिमतपूरला रघुनाथपूर कसं करता येईल.देवेंद्रजींशी बोलेन आणि जे तुमच्या मनात आहे, जे जनतेच्या मनात आहे, ते होईल. काळजी करू नका", असा शब्द बावनकुळे यांनी रहिमतपूरमधील नागरिकांना दिला.
रहिमतपूर नाव कसे पडले?
प्रतापगडाचे रणसंग्रामावेळी अफझल खानासोबत वकील कृष्णाजी भास्कर, सय्यद बंडा यांच्याबरोबरच रहिमतखानही होता. रहिमतखानला अफझल खानाच्या मदतीसाठी विजापूरहून वाईला पाठवण्यात आले होते. ज्या ठिकाणी रहिमत खानाने छावणी टाकली होती. तिथे जे गाव अस्तित्वात आले, ते रहिमतपूर आहे, अशी नोंदी इतिहासात आहेत.