"पवार गटाचे ५ खासदार फोडा, केंद्रात मंत्रिपद मिळवा, अजितदादा गटाला..."; संजय राऊतांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2024 12:41 IST2024-12-13T12:39:36+5:302024-12-13T12:41:53+5:30
काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खासदार शरद पवार यांची भेट घेतली. यानंतर राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.

"पवार गटाचे ५ खासदार फोडा, केंद्रात मंत्रिपद मिळवा, अजितदादा गटाला..."; संजय राऊतांचा दावा
Maharashtra Politics ( Marathi News ) : काल १२ डिसेंबर रोजी खासदार शरद पवार यांच्या वाढदिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांनी दिल्लीत खासदार शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर आता महाराष्ट्राच्या राजकारणातील समीकरणे बदलणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर लगेच राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट घेतली. दरम्यान, आता या भेटीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठा दावा केला आहे.
“ED, CBI यंत्रणा आमच्या ताब्यात असत्या तर १५ मिनिटांत भाजपा रिकामा केला असता”: संजय राऊत
खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना अजित पवार यांनी शरद पवार यांचे पाच खासदार फोडा केंद्रात मंत्रिपद मिळवा अशी ऑफर असल्याचा दावा केला आहे. यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले, अजित पवार यांच्यासोबत आणि भाजप सोबत जाणं हे एकच आहे. मी शरद पवार यांना ओळखतो. मी रोजच त्यांच्यासोबत असतो. संसदेत राज्यसभेत त्यांची आणि माझी बसण्याची जागा बाजू-बाजूलाच आहे. कुणीतरी फार ठरवून हे जागावाटप केलेलं आहे. धर्मांध शक्तीपासून दूर राहण्याचा विचार यशवंतराव चव्हाण यांच्यापासून या महाराष्ट्रात बिंबविण्याचा प्रयत्न केला अशा विचारापासून शरद पवार दूर जातील असं मला वाटत नाही, असंही खासदार संजय राऊत म्हणाले.
"या संदर्भात गौतम अदाणी मध्यस्थी करत आहेत. त्यांच्या घरी सध्या राजकीय चर्चा होतात. महाराष्ट्राचे भविष्य घडविण्याचा ते प्रयत्न करतात . हे गौतम अदानी महाराष्ट्राचे सामाजिक आणि राजकीय भवितव्य घडवणार आहेत. - ते दादा धर्माधिकारी आहेत का? विनोबा भावे आहेत का ?ते यशवंतराव चव्हाण आहेत का ? एक उद्योगपती नरेंद्र मोदींचा मित्र आहे. तो महाराष्ट्रात राजकारण करणार, महाराष्ट्राचा भवितव्य ठरविणार आणि हे मुंड्या खाली घालून त्यांच्या घरी बसत आहेत. त्यांना लाज वाटली पाहिजेत स्वतःला मराठी म्हणून घ्यायला, असा टोलाही राऊत यांनी लगावला.
संजय राऊतांचा मोठा दावा
संजय राऊत म्हणाले, अजित पवार गटाला मंत्रिपद यासाठी नाही की प्रफुल्ल पटेल किंवा अजित पवार गटाला सांगितलं आहे की, पवार यांचे पाच खासदार फोडून घेवून या तेव्हा सहाचा कोटा पुर्ण होईल. नंतर मंत्रिपद मिळेल. शरद पवारांनी कष्टाने निवडून आणलेले खासदार आता ही लोक फोडत आहेत. फुटणाऱ्याला शरम वाटली पाहिजे, असंही संजय राऊत म्हणाले.