Both Deshmukh's mother did not have a baby, so they made my image obsolete ..! | दोन्ही देशमुखांची हांजी हांजी न केल्यामुळेच त्यांनी माझी प्रतिमा मलिन करून टाकली..!
दोन्ही देशमुखांची हांजी हांजी न केल्यामुळेच त्यांनी माझी प्रतिमा मलिन करून टाकली..!

ठळक मुद्दे‘लोकमत’ भवनमध्ये बनसोडे यांनी आज सदिच्छा भेट दिली‘लोकमत फेसबुक लाईव्ह’च्या  माध्यमातून त्यांनी अनेक गौप्यस्फोट केलेआपण कोणाची हांजी हांजी केली नाही, राजकारणाला दुकानदारी केली नाही अशी अनेक बेधडक उत्तरे दिली

सोलापूर: ‘माझा इथं काही मुलगा येऊन निवडणुकीसाठी उभारणार नाही, अथवा माझा इथं कुठला कारखाना नाही. लोकं माझ्यावर प्रेम करताहेत. ‘मला काही राजकारण करायचं नाही, समाजकारण हा मुद्दा घेऊनच मी खासदार झालो, असे स्पष्ट करताना माजी खासदार शरद बनसोडे यांनी सहकारमंत्री सुभाष देशमुख आणि पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. दोन देशमुखांची मी हांजी हांजी न केल्यामुळे या दोघांनी माझी प्रतिमा मलिन केली. त्यामुळेच मला उमेदवारी मिळाली नाही, असा आरोप त्यांनी केला. संधी मिळाल्यास मोहोळ मतदारसंघातून विधानसभेतून निवडणूक लढणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

‘लोकमत’ भवनमध्ये बनसोडे यांनी आज सदिच्छा भेट दिली.  यावेळी ‘लोकमत फेसबुक लाईव्ह’च्या  माध्यमातून त्यांनी अनेक गौप्यस्फोट केले. आपण कोणाची हांजी हांजी केली नाही, राजकारणाला दुकानदारी केली नाही अशी अनेक बेधडक उत्तरे दिली.

प्रश्न: पाच वर्षे आपण काम करूनही भाजपने आपली उमेदवारी का टाळली ?
उत्तर: पक्षाची काही धोरणं असतात. हाच चेहरा पुन्हा द्यायचा का? किंवा नवा चेहरा दिला तर ग्रेस मिळेल का? असा पक्ष विचार करत असतो आणि दुसरा एक निकष म्हणजे आधी सर्व्हे केला जातो. त्यामुळे कदाचित निर्णय घेतला असावा.
सोलापूरचे दोन मंत्री त्यांची प्रचंड गटबाजी. मला कोणाची हांजी हांजी करायची इच्छाच नव्हती आणि राजकारण हे काही मी काही दुकानदारी केलेली नाही.  या दोघांसमोर मला हांजी हांजी करणं जमलं नाही.

प्रश्न: म्हणजे कोण?  
उत्तर: पालकमंत्री आणि बापू. त्यातल्यात्यात बापूंना वाटतंय की, आमच्या दारासमोर येऊन बसावं. 

प्रश्न: त्यांच्या भांडणाचं मूळ कारण काय?
उत्तर: काय ते असेल पण मी या दोघांना पुढे वरचढ ठरेल याची कल्पना आली असणार आणि त्यामुळे त्यांनी  माझ्याबद्दलचे चित्र उभे केलेले असेल. 

प्रश्न: तुम्ही म्हणता या दोघांमध्ये प्रचंड गटबाजी आहे? (मध्येच प्रश्न तोड) 
उत्तर: मी म्हणत नाही, सारं सोलापूर म्हणतंय.

प्रश्न: मूळ कारण काय?
उत्तर: पूर्वीपासूनच आहे. मला सांगा नगरसेवक वाटून घ्यायची ही काय पद्धत असते का? हे सोळा माझे.. हे ३२ माझे. हे काय नोकरं आहेत का तुमची!
जनतेने भाजपचे म्हणून निवडून दिले आहे त्यांना. आज एकाने मिटींग बोलावली की दुसरे येत नाहीत. यांनी बोलावले तिकडचे येत नाहीत. अरे काय आहे काय हे!

प्रश्न : हे जे सारं काही चाललं त्याबद्दल एक खासदार म्हणून तुम्ही वरिष्ठांपर्यंत पोहोचवलं का? 
उत्तर: पोहोचवलं होतं.

प्रश्न: कुणाशी बोललात..
उत्तर: मुख्यमंत्र्यांशी बोललो होतो. 

प्रश्न: काय म्हणाले...
उत्तर: सांगितले. त्या दोघांमध्ये समेट करा आणि प्रेस घेऊन सांगा. आम्ही प्रेस घेऊन सांगितलं होतं. 

प्रश्न: निष्पन्न काय झालं?
उत्तर: काही होत नाही. त्यात संघाच्या मंडळींनीही प्रयत्न केला. भोजनाच्या निमित्ताने एकत्र आणले पण काही उपयोग झाला नाही. यांची तोंडं इकडं आणि त्यांची तिकडं आणि दोघेही मोबाईलमध्येच व्यस्त. कसा एकोपा साधला जाणार त्यांच्यामध्ये.

प्रश्न: असो.. तिकीट नाकारल्यानंतरची तुमची प्रतिक्रिया काय होती?
उत्तर: माझी पक्षाबद्दलची काही तक्रार नाही. त्यांनी मला खूप काही संधी दिली. पण सांगायचा मुद्दा असा की, माझा इथं काही मुलगा येऊन निवडणुकीसाठी उभारणार नाही. माझा इथं कुठला कारखाना नाही. लोकं  माझ्यावर प्रेम करताहेत. समाजकारण करतो मी राजकारण नाही. 

प्रश्न: माझा कारखाना नाही हा टोमणा कुणाला मारताय विजयकुमार देशमुखांना का सुभाष देशमुखांना?
उत्तर: जेवढे काही राजकारणी आहेत आणि जे काही इनकमिंग आहेत, ते सगळे गनपॉर्इंटवर ठेवल्यामुळे येऊ लागले आहेत आणि जे काही टिकून आहेत ते पुढे वर्चस्व टिकवून ठेवण्यासाठी हे त्यांचं चाललं आहे. मला काय करायचंय? माझ्यानंतर मुलाला राजकारणात आणायचं नाही. 

प्रश्न: पक्षाबद्दल नाराज आहात का?
उत्तर: मुळीच नाही. यापूर्वीच मी म्हणालोय, मला खूप काही दिलंय. पण प्रचाराच्या काळात माझी इच्छा असूनही मला सहभागी होता आलं नाही. कुणीच बोलावलं नाही.

प्रश्न: याबद्दल कोणाकडे खंत व्यक्त केली काय?
उत्तर: नाही, पण आताचे उमेदवार दीड लाख मताधिक्याने आले त्यात आणखी भर टाकू शकलो असतो. 

प्रश्न: नूतन खासदारांचं अभिनंदन करण्याचं कर्तव्य तुम्ही बजावलं का?
उत्तर: मी ट्राय केला कदाचित मोबाईलच्या व्यस्त नेटवर्कमुळे तो लागला नसावा, पण आता ते जेव्हा दिल्लीतून येतील त्यावेळी त्यांचा सत्कार निश्चित करेन. 

प्रश्न: गुरुंना संधी मिळाली म्हणून जयसिध्देश्वर महास्वामी खासदार झाले आता तुम्हाला आमदार बनण्याची संधी आली तर तुम्ही स्वीकारणार का? अन्य कोणत्या पक्षाकडून संधी दिली तर....?
उत्तर: पक्षाने संधी दिली तर तयार असेन. 

प्रश्न: फेसबुक लाईव्हद्वारे आपण राष्टÑवादीत जाणार आहात काय असं विचारलं जातंय? आपण काय सांगाल?
उत्तर : अनगरमध्ये एका कार्यक्रमाच्या निमित्तानं राजन पाटील यांच्यासमवेत उपस्थित राहण्याचा योग आला. त्यांचे पुत्र बाळराजे यांच्याशी आपला संबंध आला. ते माझे चांगले मित्र आहेत. त्यामुळे लोकांना असं वाटलं असावं. पण, तरी शेवटी कालायतस्मय नम: हा एक प्रकार असतो. काळाच्या ओघात काय दडलेलाय कुणास ठाऊक. 

प्रश्न: म्हणजे थोडक्यात वाटलं असावं आणि होऊ शकतो हे दोन्ही सारखं आहे असं म्हणायचं का?
उत्तर : हे आपण काळावर सोपवू यात.

कार्यकर्त्यांमध्ये त्यांनी विस्कळीतपणा आणला
- दोन्ही देशमुखांचं तोंड वाकडं ना कायमच. जे काही ते कार्यकर्त्यांसमोर प्रतिक्रिया व्यक्त करीत होते ते आमच्यासमोर पोहोचत होतं आणि त्या दोघांची भांडणं तर  सर्व सोलापूरला माहीत आहेत. मंत्री असलेल्या दोघांनी कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड विस्कळीतपणा आणला. 


Web Title: Both Deshmukh's mother did not have a baby, so they made my image obsolete ..!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.