स्फोटांनी हादरला निवासी विभाग

By Admin | Updated: December 19, 2014 05:07 IST2014-12-19T05:07:04+5:302014-12-19T05:07:04+5:30

येथील एमआयडीसी फेज १ मधील ओरेक्स फार्मा लिमिटेड या औषध कंपनीला बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास भीषण आग लागली.

Blasts in residential areas | स्फोटांनी हादरला निवासी विभाग

स्फोटांनी हादरला निवासी विभाग

डोंबिवली : येथील एमआयडीसी फेज १ मधील ओरेक्स फार्मा लिमिटेड या औषध कंपनीला बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत संपूर्ण कंपनी खाक झाली असून यातील केमिकलचा साठा असणाऱ्या ड्रमचे एकामागून एक असे ७ ते ८ स्फोट झाल्याने या स्फोटाच्या आवाजांनी आजूबाजूचा परिसर दणाणून गेला होता. यात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली
नसली तरी या घटनेत शिवनारायण विश्वकर्मा (१९) हा कामगार जखमी झाला आहे.
ओरेक्स कंपनीत खोकल्याच्या औषधाचे उत्पादन केले जाते. बुधवारी रात्री १२.३० च्या सुमारास या कंपनीला अचानक आग लागली. यावेळी कंपनीत २२ कामगार काम करीत होते. आग लागताच त्यांनी कंपनीबाहेर पलायन केले़ मात्र यातील शिवनारायण या कामगाराला या आगीची झळ बसल्याने तो जखमी झाला. त्यास उपचारार्थ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान घटना घडताच अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. औषध बनविण्यासाठी लागणाऱ्या टोलविन या घातक रसायनाने या आगीत पेट घेतल्याने मोठे स्फोट झाले. या स्फोटांचा आवाज इतका प्रचंड होता की बाजूकडील ग्रामीण आणि निवासी विभागाबरोबरच सुमारे ४ ते ५ किलोमीटर परिसरापर्यंतचा परिसर दणाणून गेला होता.
सुदैवाने कंपनीच्या भोवती दाट वस्ती नसल्याने आणि कंपनीचे कामगार वेळीच बाहेर पडल्याने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. अग्निशामक दलाचे १० बंब आणि २ टँकर यांनी तब्बल ६ तासांनंतर या आगीवर नियंत्रण मिळविले. यानंतर सकाळी या कंपनीत पुन्हा आग लागल्याची घटना घडली होती. आगीचे नेमके कारण समजू शकलेले नाही. या घटनेची मानपाडा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात
आली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Blasts in residential areas