राहुल गांधींना 'हा' प्रश्न विचारण्याची हिंमत उद्धव ठाकरे दाखवतील का?; भाजपाने दिले आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2024 03:40 PM2024-03-14T15:40:32+5:302024-03-14T15:41:38+5:30

राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे लवकरच मुंबईत एकाच मंचावर सभा घेणार

BJP slams Uddhav Thackeray after Amit Shah challenge to clear his stand on CAA | राहुल गांधींना 'हा' प्रश्न विचारण्याची हिंमत उद्धव ठाकरे दाखवतील का?; भाजपाने दिले आव्हान

राहुल गांधींना 'हा' प्रश्न विचारण्याची हिंमत उद्धव ठाकरे दाखवतील का?; भाजपाने दिले आव्हान

Uddhav Thackeray vs BJP Amit Shah on CAA Act: सध्या लोकसभा निवडणूक 2024 साठी सर्वच राजकीय पक्ष तयारी करत आहेत. भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना हे एकेकाळचे मित्र असलेले पक्ष सध्या एकमेकांवर टोकाची टीका करताना दिसत आहेत. उद्धव ठाकरे यांच्या पक्षात फूट पडल्यानंतर भाजपने ठाकरे गटावर कायमच टीका केली आहे. या टीकेचा उद्धव ठाकरेंनी देखील वारंवार समाचार घेतला आहे. परंतु आता थेट लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपने सीएए कायदा लागू केल्यानंतर, आज उद्धव ठाकरेंनी भाजपवर पुन्हा एकदा निशाणा साधला. त्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही चोख प्रत्युत्तर देत त्यांना आव्हान दिले.

सीएएच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे नुकतेच एका सभेत म्हणाले की, देशात सीएए नवीन कायदा आणला आहे. यामुळे देशाबाहेरील हिंदू, शीख, पारशी आणि जैन यांना आपल्या देशात आणले जाईल. ही फक्त निवडणूक खेळी आहे. मी मुख्यमंत्री असताना भाजपाने देशात CAA आणि NRCचे भूत आणले. मागच्या वेळी जेव्हा CAA आला तेव्हा लोकांच्या मनात, विशेषतः आसामच्या लोकांच्या मनात भीती निर्माण झाली होती. CAAचा मुद्दा सध्या न्यायप्रविष्ट असूनही केंद्र सरकारने सीएएची अधिसूचना जारी केली आहे. परदेशातील हिंदूंना देशात आणायचे असेल तर आधी काश्मिरी पंडितांना परत आणा आणि मग CAA आणा, असे रोखठोक मत उद्धव ठाकरे यांनी मांडले होते. यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरेंना प्रत्युत्तर दिले.

"उद्धव ठाकरे, हिंमत असेल तर द्या उत्तर! नागरिकत्व सुधारणा कायद्यावर तुमची भूमिका काय? हे आधी जाहीर करा, असे आव्हान आमचे नेते आणि देशाचे कणखर गृहमंत्री अमित शाह यांनी आज उद्धव ठाकरे यांना दिले आहे. उद्धव ठाकरे यांच्यात खरंच हिंमत असेल तर त्यांनी नागरिकत्व सुधारणा कायद्याबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी. हिंदुत्व विसरलेल्या आणि आता काँग्रेससमोर शरण गेलेल्या ठाकरेंना या प्रश्नाचे उत्तर द्यावेच लागेल. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा वारंवार अपमान करणाऱ्या राहुल गांधी यांच्या मुंबईतील स्वागतासाठी उद्धव ठाकरे आसुसलेले आहेत. त्यांच्यासाठी त्यांनी पायघड्या घातल्या आहेत. ‘‘स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान तुम्ही वारंवार का करता‘‘ हा प्रश्न राहुल गांधी यांना विचारण्याची हिंमत तरी उद्धव ठाकरे दाखवतील का? या प्रश्नांची उत्तरं महाराष्ट्रातील जनतेला हवी आहेत," असे ट्विट करत बावनकुळे यांनी ठाकरेंना सवाल केला.

Web Title: BJP slams Uddhav Thackeray after Amit Shah challenge to clear his stand on CAA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.