"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2024 07:22 PM2024-05-25T19:22:56+5:302024-05-25T19:24:25+5:30

Bihar Lok Saha Election : बिहारमध्ये बोलताना पंतप्रधान मोदींनी मुस्लिम आरक्षणवरुन आरजेडी आणि काँग्रेसला लक्ष्य केलं होतं.

Bihar Lok Sabha Tejashwi Yadav counterattack on PM Modi reservation statement | "मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार

"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार

Tejashwi Yadav slams PM Modi : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बिहार दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय जनता दलावर जोरदार निशाणा साधला. पंतप्रधान मोदींनी एनडीएचे उमेदवार उपेंद्र कुशवाह यांच्या समर्थनार्थ करकटमध्ये सभा घेतली. यावेळी त्यांनी बिहारमधील गरिबांना लुटणारा राजा किंवा राजपुत्र कितीही मोठा असला तरी त्याला तुरुंगात जाऊन तुरुंगाची भाकरी खावीच लागेल, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. ही एनडीए सरकार आणि मोदींची हमी आहे, असंही पंतप्रधान मोदी म्हणाले. यावर आता तेजस्वी यादव यांनी मोदींना प्रत्युत्तर दिलं.

जमीन-नोकरी घोटाळा प्रकरणात लालू-तेजस्वी यांचे नाव न घेता पंतप्रधान मोदींनी यादव कुटुंबावर निशाणा साधला. त्यांनी गरिबांची लूट केली आणि नोकरीच्या बदल्यात त्यांच्या जमिनी घेतल्या. त्यांनी आता कान उघडून ऐकावं की त्यांच्या तुरुंगात जाण्याची वेळ सुरू झाली आहे, असं पंतप्रधान मोदी म्हणाले. हेलिकॉप्टरमधून प्रवास करण्याची वेळ संपताच तुरुंगात जाण्याचा मार्ग ठरवावा लागेल. बिहारची लूट करणाऱ्यांना एनडीए सरकार सोडणार नाही, असाही इशारा मोदींनी दिला.

याआधी पाटलीपुत्र येथे झालेल्या सभेतही नरेंद्र मोदींनीं मुस्लिम आरक्षणावरून आरजेडी आणि काँग्रेसला धारेवर धरलं होतं. बिहारमधील अतिमागास, ओबीसी, अनुसूचित जाती आणि जमातीच्या कुटुंबांना मी हमी देतो की जोपर्यंत ते जिवंत आहेत तोपर्यंत त्यांचे हक्क हिरावून घेऊ देणार नाहीत. मोदींसाठी संविधान सर्वोपरि आहे. इंडीया आघाडीला व्होटबँकेची गुलामगिरी करायची असेल किंवा तिथे जाऊन मुजरा करायचा असेल तर करा. पण मी अनुसूचित जाती आणि जमातीच्या, ओबीसी आरक्षणाच्या पाठीशी उभा आहे आणि उभा राहीन, असे मोदी म्हणाले.

मोदींनी केलेल्या टीकेला आता तेजस्वी यादव यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी माध्यमांशी बोलताना पंतप्रधान मोदींवर जोरदार निशाणा साधला. गुजरातमध्ये २५ मुस्लिम जातींना आरक्षण मिळाले आहे. मोदी तिथे १३ वर्षे मुख्यमंत्री होते, त्यांना हे माहीत नाही का? यावर ते का बोलत नाहीत?, असा सवाल तेजस्वी यादव यांनी केलाय.

"पंतप्रधान नरेंद्र मोदींना राज्यघटनेचे मूलभूत ज्ञानही नाही. संपूर्ण देशात जातीय जनगणना करण्यासाठी आम्ही पंतप्रधानांना पाच वेळा पत्रे लिहिली. बिहारचे शिष्टमंडळ त्यांना भेटायला गेले पण त्यांनी नकार दिला. पंतप्रधान मोदींनी आपली भाषा सुधारली पाहिजे आणि संविधानाचे मूलभूत ज्ञानही समजून घेतले पाहिजे," असाही टोला तेजस्वी यादव यांनी लगावला.

Web Title: Bihar Lok Sabha Tejashwi Yadav counterattack on PM Modi reservation statement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.