गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2024 08:28 PM2024-05-25T20:28:28+5:302024-05-25T21:06:37+5:30

Gujarat Fire : गुजरातच्या राजकोटमध्ये भीषण आगीत वीस जणांचा होरपळून मृत्यू झालाय. मृतांची आकडा वाढण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे.

Gujarat 20 people died in a massive fire at the TRP game zone in Rajkot | गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता

गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता

Rajkot Game Zone Fire : गुजरातमधून अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे. गुजरातच्या राजकोटमध्ये लागलेल्या आगीत वीस जणांचा होरपळून मृत्यू झालाय. गुजरातच्या राजकोटमधील टीआरपी गेम झोनमध्ये लागलेल्या भीषण आगीत २० जणांचा मृत्यू झाला आहे. आगीच्या घटनेमुळे संपूर्ण गेम झोन खाक झाला आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ८ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. बचावकार्यासह आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. आग विझल्यानंतरच परिस्थिती स्पष्ट होईल, असे पोलिसांनी म्हटलंय. या घटनेनंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनीही प्रशासनाला बचाव आणि मदतकार्य हाती घेऊन जखमींवर उपचाराची व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

राजकोटमधील टीआरपी गेमिंग झोनमध्ये लागलेल्या भीषण आगीत मृतांची संख्या २० वर पोहोचली आहे. दुपारच्या सुमारास लागलेल्या या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न प्रशासनाकडून सुरु आहे. आगीचे कारण काय आहे याचा आम्ही तपास करत आहोत. यासोबतच शहरातील सर्व गेमिंग झोन बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे राजकोट पोलीस आयुक्तांनी दिले आहेत. या आगीच्या घटनेतून १० हून अधिक जणांना वाचवण्यात यश आले आहे. गेम झोनमध्ये अजूनही लोक अडकले असण्याची शक्यता आहे. या आगीत संपूर्ण गेम झोन जळून खाक झालाय. त्यामुळे मृतदेहांची ओळख पटवणे देखील अवघड झालं आहे. आगीचे कारण मात्र अद्याप समोर आलेलं नाही.

"टीआरपी गेमिंग झोनमध्ये दुपारी आग लागली होती. बचावकार्य अद्याप सुरू आहे मात्र आग आटोक्यात आली आहे. आम्ही शक्य तितके मृतदेह बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहोत. आतापर्यंत सुमारे २० मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत आणि पुढील तपासासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. हा गेमिंग झोन युवराज सिंग सोलंकी नावाच्या व्यक्तीच्या मालकीचा आहे. निष्काळजीपणा आणि मृत्यू झाल्याबद्दल आम्ही गुन्हा नोंदवणार आहोत. आम्ही येथे बचाव कार्य पूर्ण केल्यानंतर पुढील तपास केला जाईल," अशी माहिती राजकोटचे पोलिस आयुक्त राजू भार्गव यांनी दिली.

दरम्यान, माध्यमांच्या वृत्तानुसार, गेम झोनच्या मालकाला अटक करण्यात आली आहे. युवराज सिंग सोलंकी, मनविजय सिंग सोलंकी हे गेम झोनचे मालक आहेत, तर प्रकाश जैन आणि राहुल राठोड हे गेम झोनचे व्यवस्थापक आहेत.

Web Title: Gujarat 20 people died in a massive fire at the TRP game zone in Rajkot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.