"विरोधकांच्या ठिकऱ्या उडणार, बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी करणाऱ्यांनी..."; भाजपाचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2025 16:01 IST2025-09-08T15:58:47+5:302025-09-08T16:01:53+5:30
BJP vs Shivsena Sanjay Raut : "राऊतांना गणेशोत्सवापेक्षा अफजलखानाची कबर जास्त प्रिय" अशीही भाजपाची टीका

"विरोधकांच्या ठिकऱ्या उडणार, बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी करणाऱ्यांनी..."; भाजपाचा टोला
BJP vs Shivsena Sanjay Raut : उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा विजय होईल असा आम्हाला विश्वास आहे. या निवडणुकीत 'युपीए'च्या ठिकऱ्या उडणार आहेत. युपीएतील खासदारसुद्धा आता राहुल गांधींच्या अपरिपक्व राजकारणाला कंटाळले असून क्रॉस व्होटिंगचा युपीएला धोका आहे. सर्वाधिक सावध राहण्याची गरज युपीए आणि राहुल गांधी यांना आहे. त्यामुळे संजय राऊत यांनी राहुल गांधी यांना सावधगिरीचा सल्ला द्यावा, अशी खोचक टीका भारतीय जनता पार्टीचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांनी सोमवारी केली. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी गद्दारी करणाऱ्या उद्धव ठाकरे, संजय राऊतांनीभाजपाला शहाणपण शिकवू नये, असेही ते म्हणाले.
"भारतीय जनता पार्टीने यावेळी मुहूर्त न काढता उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक पितृपक्षात घेतल्यामुळे भाजपा हा सेक्युलर झाला असे संजय राऊत म्हणालेत. भाजपासाठी ३६५ दिवस पवित्र असल्याने आम्हाला निवडणुकीचा मुहूर्त काढावा लागत नाही. पितृपक्ष असल्याने निवडणूक घेऊ नये, हा संजय राऊत यांचा केवळ बहाणा आहे. खरं म्हणजे ते घाबरले असून निवडणुकीपासून पळ काढत आहेत," असे ते म्हणाले.
राऊतांना गणेशोत्सवापेक्षा अफजलखानाची कबर जास्त प्रिय!
"मुंबई महापालिका निवडणुकीत मविआचा नव्हे तर महायुतीचा महापौर होणार आहे. संजय राऊत यांनी दिवसा स्वप्न पाहणं थांबवावे. आज खरी शिवसेना भाजपासोबत आहे. आगामी महापालिका निवडणुकाही आम्ही मराठी माणसाच्या आणि सर्वसामान्यांच्या ताकदीवर जिंकणार आहोत. गणेशोत्सव हा हिंदूंचा आहे. लालबागचा राजा राऊत यांना पावणार नाही, कारण राऊतांना गणेशोत्सवापेक्षा अफजलखानाची कबर जास्त प्रिय वाटते. संपूर्ण महाराष्ट्र आनंदाने गणेशोत्सव साजरा करतो पण तुम्हाला नेमके तेच खुपते. गणेशोत्सवाला जात नाही असं कितीही राऊत यांनी सांगितलं तरी महाराष्ट्राचा प्रत्येक नागरिक तो मोठ्या उत्साहात साजरा करतो," असा भाजपाने घणाघात केला.
भाजपाचा बाप काढणाऱ्यांनी बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी केली !
"देवाभाऊ’ यांच्या जाहिरातीवर टीका करताना राऊत भाजपाचा बाप काढत आहेत. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी उद्धव ठाकरे, संजय राऊतांनी गद्दारी केली. बाळासाहेबांचे शेवटच्या दिवसांत कसे हाल केले गेले, याबाबत खुद्द राज ठाकरे यांनीच सांगितलं आहे. ज्यांनी आपल्या वडिलांना अशी वागणूक दिली, ज्यांना त्यांचे कार्यकर्ते सोडून गेले, त्यांना दुसऱ्याचा बाप काढण्याचा अधिकार नाही," असा टोला भाजपाने लगावला.