Manda Mhatre: भाजप आमदार मंदा म्हात्रे यांना हृदयविकाराचा झटका; एकनाथ शिंदेंकडून तब्येतीची विचारपूस!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2026 18:47 IST2026-03-17T18:45:18+5:302026-03-17T18:47:32+5:30
Manda Mhatre Hospitalized: भाजपच्या आमदार मंदा म्हात्रे यांना हृदयविकाराचा झटका आला असून, त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Manda Mhatre: भाजप आमदार मंदा म्हात्रे यांना हृदयविकाराचा झटका; एकनाथ शिंदेंकडून तब्येतीची विचारपूस!
बेलापूर मतदारसंघाच्या भाजपच्या आमदार मंदा म्हात्रे यांना हृदयविकाराचा झटका आला असून, त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या प्रकृतीची माहिती मिळताच राजकीय वर्तुळात चिंतेचे वातावरण पसरले असून, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्याशी थेट संवाद साधून त्यांना धीर दिला आहे.
आमदार मंदा म्हात्रे रुग्णालयात झाल्याची माहिती मिळताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना व्हिडिओ कॉल केला. या संवादाचा एक व्हिडिओ समोर आला असून, त्यामध्ये शिंदे म्हात्रे यांना धीर देताना दिसत आहेत. "मंदा ताई, तुमच्या मागे तुमच्या मतदारसंघातील गोरगरीब जनतेचा आशीर्वाद आहे. चिंता करण्याची गरज नाही, आम्ही सगळे आपल्या सोबत आहोत. तुम्ही काळजी करू नका. आपल्याला लवकर बरे होऊन पुन्हा जोमाने कामाला सुरुवात करायची आहे आणि जनतेची सेवा करायची आहे", असे एकनाथ शिंदे म्हणाले.
नवी मुंबईतील बेलापूर विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मंदा म्हात्रे यांना हृदयविकाराचा झटका आल्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना समजताच त्यांनी व्हिडीओ कॉल करून संवाद साधला आणि काळजी घेण्याचे सांगितले. #mandamatre#eknathshinde#shivsena#newmumbai#storydotcompic.twitter.com/hEZo3YRCMQ
— Story Dot Com (@storydotcomnews) March 17, 2026
मंदा म्हात्रे या नवी मुंबईतील भाजपच्या अत्यंत प्रभावशाली नेत्या मानल्या जातात. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतले होते. या निवडणुकीत त्यांनी नवी मुंबईचे ज्येष्ठ नेते गणेश नाईक यांचे पुत्र संदीप नाईक यांचा पराभव केला होता. संदीप नाईक यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर ही निवडणूक लढवली होती, मात्र म्हात्रे यांनी आपला गड राखण्यात यश मिळवले होते. सध्या मंदा म्हात्रे यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, यासाठी त्यांचे समर्थक प्रार्थना करत आहेत.