Parinay Fuke Priya Fuke Police video: महाराष्ट्राचे विधान परिषदेचे आमदार व भाजप नेते परिणय फुके यांच्या भावाची पत्नी प्रिया फुके यांनी महिन्याभरापूर्वी पत्रकार परिषद घेत, त्यांच्या दिवंगत पतीच्या कुटुंबावर गंभीर आरोप केले होते. फुके कुटुंबाकडून मला वारंवार जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत आणि राजकीय नेत्यांकडून मदत मागितल्यानंतरही कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही, असे प्रिया फुके यांनी म्हटले होते. या विषयावर आज न्याय मागण्यासाठी प्रिया फुके त्यांंच्या मुलांसह विधानभवनाबाहेर आल्या असत्या पोलिसांनी दडपशाही करून त्यांना ताब्यात घेतले. याचा व्हिडीओ व्हायरल झाला असून, शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या रोहिणी खडसे यांनी यावरून सरकारला धारेवर धरलं आहे.
व्हायरल व्हिडीओमध्ये काय?
रोहिणी खडसे यांनी व्हायरल होत असलेला व्हिडीओ ट्विट केला आहे. त्यात स्पष्टपणे दिसून येते की, प्रिया फुके या आपल्या मुलांसोबत मिडियाशी काहीतरी बोलण्यासाठी येत आहेत. त्यावेळी त्या आपल्या बॅगेतून एक कागद काढून मिडियाला देण्याचा प्रयत्न करतात. पण त्याचवेळी महिला पोलिस तेथे येऊन त्यांना अडवते, त्यांच्या हातून कागद हिसकावून घेते, तसेच इतर पोलिस त्यांनी घेरतात आणि पोलिसांच्या मोठ्या व्हॅनमध्ये टाकून ताब्यात घेतात. घडलेल्या प्रकारादरम्यान, प्रिया फुके या 'मुख्यमंत्र्यांनी आम्हाला भेटीची वेळ द्यावी, वर्षभर आम्ही वेळ मागतोय, आम्हाला न्याय द्यावा' असे म्हणताना दिसतात.
रोहिणी खडसेंचे ट्विट-
"मंत्री परिणय फुके यांच्या भावाची पत्नी प्रिया फुके आज विधानभवनात न्याय मागण्यासाठी आली होती. तर तिला तिच्या मुलांसह पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अरे, जरा तरी लाज वाटू द्या रे गिधाडांनो ! एक निराधार महिला आपल्याला न्याय मिळावा या अपेक्षेने आपल्या चिमुकल्या मुलांसह सरकारच्या दारात येते, तर तिला अशाप्रकारे डांबण्यात येते? कुठे हे फेडाल ही पापं? एका निराधार महिलेशी असे वर्तन झाले, कुठे आहे महिला आयोगाच्या अध्यक्षा? कुठंय ती प्रत्येक गोष्टीत नाक खुपसणारी चित्रविचित्र बाई? आता समोर नाही येणार का? का, आरोपी भाजपचे आहेत म्हणून?", असे ट्विट करत रोहिणी खडसे यांनी सरकारवर आरोप केले आहेत.