पंकजा मुंडेंच्या भूमिकेवर पक्ष नाराज; दिल्लीत होणार तक्रार?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2019 06:45 PM2019-12-12T18:45:42+5:302019-12-12T19:05:03+5:30

पक्षातील वाद व्यासपीठावर नेल्यानं पक्ष मुंडे आणि खडसेंवर नाराज

bjp leadership unhappy with pankaja munde and eknath khadse | पंकजा मुंडेंच्या भूमिकेवर पक्ष नाराज; दिल्लीत होणार तक्रार?

पंकजा मुंडेंच्या भूमिकेवर पक्ष नाराज; दिल्लीत होणार तक्रार?

Next

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून भाजपापासून काहीशा दूर असलेल्या पंकजा मुंडेंनी आज गोपीनाथ गडावरुन समर्थकांशी संवाद साधत त्यांच्या मनातील खदखद व्यक्त केली. राज्यातील नेतृत्त्वावर नाराजी व्यक्त करताना मुंडेंनी माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलं. मात्र त्यांच्या भूमिकेबद्दल पक्ष नाराज असल्याचं समजतं. पक्षातील वाद व्यासपीठावर मांडणं राज्यातील पक्ष नेतृत्त्वातील काही नेत्यांना न पटल्याचं वृत्त 'एबीपी माझा' या वृत्तवाहिनीनं दिलं आहे. त्यामुळे पंकजा मुंडेंची तक्रार दिल्लीतील केंद्रीय नेतृत्त्वाकडे केली जाण्याची शक्यता आहे. 

विधानसभा निवडणुकीपासून पक्षावर नाराज असलेल्या पंकजा मुंडेंची समजूत काढण्याचे प्रयत्न भाजपाकडून सुरू होते. त्या पार्श्वभूमीवर पंकजा यांनी गोपीनाथ गडावरुन समर्थकांना संबोधित केलं. त्यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाव न घेता टीका केली. त्यांच्या या पवित्र्यावर राज्य भाजपामधील वरिष्ठ नेते नाराज आहेत. मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून राज्यात सक्रीय होण्याचं मुंडेंनी आज जाहीर केलं. मात्र मुंडेंची घोषणा पक्षाला फारशी रुचलेली नाही.

बीडमधील कार्यक्रमात आक्रमक भाषण केल्यानंतर मुंबईत दाखल झालेल्या पंकजा यांना पक्षाच्या नाराजीबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर मुंडेंनी अतिशय मोजक्या शब्दांत सूचक उत्तर दिलं. मी आता पक्षाच्या कोअर कमिटीची सदस्य राहिलेली नाही, असं मुंडे म्हणाल्या. पंकजा मुंडे आणि एकनाथ खडसेंनी आज त्यांच्या मनातील नाराजी बोलून दाखवली. या दोन्ही नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलं. 

काय म्हणाल्या पंकजा मुंडे?
मी एक मशाल घेऊन महाराष्ट्रभर दौरा करणार असून, सर्व कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेलं गोपीनाथ मुंडेंचं स्मारक बनवू नका, असंही मुंडेंनी सांगितलं आहे. मराठवाड्याला दुष्काळमुक्त करा आणि चांगला सधन शेतकरी तयार करण्यासाठी योगदान द्या, असं आवाहनच त्यांनी केलं. 27 जानेवारीला औरंगाबादला मी लाक्षणिक उपोषण करणार असून, मराठवाड्याच्या पाण्याच्या शेतकऱ्यांच्या सिंचनाच्या प्रश्नावर लक्ष वेधणार असल्याचंही पंकजा मुंडेंनी बोलून दाखवलं आहे. पाच वर्षांत जे केलं त्याला पुढे नेण्यासाठी या सरकारचं योगदान महत्त्वाचं असल्याचंही त्यांनी अधोरेखित केलं आहे.

देवेंद्र फडणवीसांवर शरसंधान
निवडणुकीच्या आधीच मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार ठरलेला होता. देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करण्यासाठी मी प्रयत्न करत होते. एकेक आमदार पक्षाला देण्यासाठी वणवण फिरत होते, असं पंकजा मुंडेंनी म्हटलं. पक्षावर कोणाचीही मालकी नसल्याचं म्हणत राज्य नेतृत्त्वावर अप्रत्यक्ष टीका केली. पक्ष ही प्रक्रिया असते. पक्षावर कुणाचीही मालकी नसते. अटलजी, राजनाथ सिंह, नितीन गडकरी आणि आता अमित शहा यांच्यासारख्यांनी अध्यक्ष म्हणून पक्षाची धुरा वाहिली आहे. पक्ष हा कोणाही एका व्यक्तीचा नाही, अशा शब्दांमध्ये पंकजांनी आक्रमक भाषण केलं.  

 

Web Title: bjp leadership unhappy with pankaja munde and eknath khadse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.