bjp leader eknath khadse meets ncp chief sharad pawar | 'टिकटिक' वाजते डोक्यात?; नाराज एकनाथ खडसे शरद पवारांच्या भेटीला
'टिकटिक' वाजते डोक्यात?; नाराज एकनाथ खडसे शरद पवारांच्या भेटीला

नवी दिल्ली: भाजपावर नाराज असलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या भेटीसाठी त्यांच्या नवी दिल्लीतील निवासस्थानी पोहोचले आहेत. खडसे आणि पवार यांच्यामध्ये गेल्या १५ मिनिटांपासून चर्चा सुरू आहे. खडसेंनी परवाच स्पष्ट शब्दांत त्यांची नाराजी व्यक्त करत पक्षाकडून असाच अन्याय होत राहिल्यास मला वेगळा विचार करावा लागेल, असा इशारा दिला होता. त्या पार्श्वभूमीवर त्यांची शरद पवारांसोबतची भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे. 

भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे अनेक महिन्यांपासून पक्षावर नाराज आहेत. राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला अपेक्षित यश न मिळाल्यानंतर आणि पक्ष सत्तेपासून दूर राहिल्यानंतर त्यांनी त्यांची नाराजी अनेकदा उघडपणे बोलून दाखवली. आपल्या मनातील खदखद ज्येष्ठ नेत्यांकडे व्यक्त करण्यासाठी खडसे आज दिल्लीला पोहोचले. त्यावेळी ते राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या भेटीसाठी ६ जनपथवर गेल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या. 

विधानसभा निवडणुकीत जळगावमधील मुक्ताईनगरमधून पक्षानं एकनाथ खडसेंना तिकीट नाकारलं. यानंतर खडसेंनी नाराजी व्यक्त केली. त्यामुळे त्यांच्या कन्या रोहिणी खडसेंना उमेदवारी देण्यात आली. मात्र त्यांचा पराभव झाला. या पराभवावरुनही खडसेंनी पक्षावर निशाणा साधला होता. विधानसभा निवडणुकीत भाजपानं तिकीट कापल्यानंतर राष्ट्रवादी खडसेंना आपल्याकडे खेचण्यासाठी उत्सुक होती. त्यांना तिकीट देण्यासाठी माजी मुख्यमंत्री अजित पवार उत्सुक होते. मात्र त्यावेळी खडसेंनी भाजपात राहणं पसंत केलं. 

दोन दिवसांपूर्वी काय म्हणाले खडसे?
पक्षाच्या कोअर कमिटीतून मला काढून टाकण्यात आलं आहे.  मला आता निर्णय प्रक्रियेतून काढून टाकण्यात आलेलं आहे. जाणीवपूर्वक मला दूर करण्यात येत असेल तर मी काय भूमिका घेतली पाहिजे. काही लोकांकडून सातत्यानं अपमान होतोय. अन्याय, अत्याचार होत राहिल्यास मला वेगळा विचार करावा लागेल, अशा इशारा खडसेंनी भाजपाला दिला. 

बहुजन समाज आणि ओबीसी नेत्यांवर अन्याय होतो आहे, अशी कार्यकर्त्यांची भावना आहे. कार्यकर्ते आजही आम्हाला अन्याय होत असल्याचं सांगत असतात. ओबीसींवर अन्याय होतो की नाही याकडे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी लक्ष वेधलेलं आहे. राज्यातल्या लोकप्रतिनिधी, माजी आमदार यांची जी भावना आहे. ती पक्षाच्या कानापर्यंत पोहोचवण्याचं काम मी केलेलं आहे. आम्हाला जातीवर बोलायाचं नाही, पण जे घडलं आहे ते तर समोर आलंच पाहिजे. हे जर कोणी करत असेल, तर त्याला प्रतिबंध बसला पाहिजे. 
 

 

 

Web Title: bjp leader eknath khadse meets ncp chief sharad pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.