'नाना पटोले यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात काँग्रेस नामशेष झाला'; आशिष देशमुख यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2024 14:25 IST2024-02-12T14:20:50+5:302024-02-12T14:25:02+5:30

भाजपाचे नेते आशिष देशमुख यांनी अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया दिली आहे. 

BJP leader Ashish Deshmukh has reacted to Ashok Chavan's resignation. | 'नाना पटोले यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात काँग्रेस नामशेष झाला'; आशिष देशमुख यांची टीका

'नाना पटोले यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात काँग्रेस नामशेष झाला'; आशिष देशमुख यांची टीका

राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे दिग्गज नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना पत्र पाठवत अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिला आहे. अशोक चव्हाण यांच्या या राजीनाम्यामुळे ते लवकरच भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे.

अशोक चव्हाण हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कार्यपद्धतीवर नाराज होते, अशी माहिती समोर येत आहे. दरम्यान, अशोक चव्हाण यांच्यासोबत मराठवाड्यातील काँग्रेसचे काही आमदारही राजीनामा देतील, अशीही माहिती समोर येत आहे. याचदरम्यान भाजपाचे नेते आशिष देशमुख यांनी अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया दिली आहे. 

नाना पटोले यांच्यासारखे प्रदेशाध्यक्ष काँग्रेसकडे आहे, त्यांच्या कारभाराला कंटाळून मोठ्या प्रमाणात काँग्रेसचे नेते सोडचिठ्ठी देताना पाहायला मिळतील. नाना पटोले यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात काँग्रेस नामशेष झाल्याचं पाहायला मिळत आहे. या सर्वाचा पडसाद असा होईल की, राज्यसभेच्या सहाच्या सहा जागा महायुती जिंकल्याशिवाय राहणार नाही, असं आशिष देशमुख यांनी म्हटलं आहे. नागपूरमध्ये आशिष देशमुख यांनी माध्यमांशी संवाद साधला. 

दरम्यान, अशोक चव्हाण यांना राज्यसभा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यात मंत्रीपद देण्यासाठी भाजपा नेत्यांकडून विरोध करण्यात आला. त्यामुळे त्यांना राज्यसभा दिली जाण्याची दाट शक्यता आहे. अशोक चव्हाण आणि त्यांच्यासोबत काँग्रेसचे ७ आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार, अशी चर्चा सातत्याने सुरु होती. पण अशोक चव्हाण यांनी त्याचे खंडन केले होते. मात्र आज राजीनामा दिल्याने अशोक चव्हाण भाजपात प्रवेश करणार अशा चर्चांना पुन्हा उधाण आले आहे.

'आगे देखो होता है क्या'- देवेंद्र फडणवीस

अशोक चव्हाण भाजपमध्ये येत आहेत, हे तुमच्याकडूनच ऐकतोय. पण काँग्रेसचे अनेक नेते संपर्कात आहेत. गेली काही वर्ष काँग्रेस जी वाटचाल करतोय, त्यामुळे अनेकांची घुसमट होतेय, असं देवेंद्र फडणवीस सांगितलं. तसेच 'आगे देखो होता है क्या', असं सूचक विधानही देवेंद्र फडणवीस यांनी आजच्या पत्रकार परिषदेत केलं. 

Web Title: BJP leader Ashish Deshmukh has reacted to Ashok Chavan's resignation.