“मराठा आरक्षण जाण्यास आजोबाच जबाबदार”; रोहित पवारांच्या ट्विटवर गोपीचंद पडळकरांचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2023 02:11 PM2023-11-28T14:11:47+5:302023-11-28T14:12:37+5:30

Gopichand Padalkar Vs Rohit Pawar: आरक्षणावरुन रोहित पवार यांनी केलेल्या टीकेला गोपीचंद पडळकर यांनी थेट शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे.

bjp gopichand padalkar replied ncp sharad pawar group rohit pawar criticism about reservation | “मराठा आरक्षण जाण्यास आजोबाच जबाबदार”; रोहित पवारांच्या ट्विटवर गोपीचंद पडळकरांचा पलटवार

“मराठा आरक्षण जाण्यास आजोबाच जबाबदार”; रोहित पवारांच्या ट्विटवर गोपीचंद पडळकरांचा पलटवार

Gopichand Padalkar Vs Rohit Pawar: आरक्षणावरून राज्याचे राजकीय वातावरण चांगलेच तापलेले दिसत आहे. मराठा आरक्षणावरून ओबीसी नेते छगन भुजबळ आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील एकमेकांवर जोरदार टीका करताना दिसत आहेत. मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण द्या, अशी मागणी मनोज जरांगे पाटील सातत्याने करत आहेत. त्याला मंत्री छगन भुजबळ यांनी कडाडून विरोध केला आहे. यातच आता आरक्षणाच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते रोहित पवार आणि भाजप नेते गोपीचंद पडळकर यांच्यात एक्सवॉर रंगल्याचे दिसत आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार सध्या युवा संघर्ष यात्रेच्या माध्यमातून राज्यातील अनेक जिल्ह्यात सरकारविरुद्ध आवाज उठवत आहेत. मात्र, त्यांच्या युवा संघर्ष यात्रेला प्रतिसाद मिळत नसल्याची टीका त्यांच्या विरोधकांकडून केली जात आहे. त्यास विविध ठिकाणी मिळत असलेल्या प्रतिसादाचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत रोहित पवार उत्तर देत आहेत. यातच रोहित पवारांनी एक्सवर एक पोस्ट शेअर केली असून, त्याला गोपीचंद पडळकरांनी प्रत्युत्तर दिले आहे. 

'महाराष्ट्र-धर्म' संपवण्याचे काम एक आधुनिक 'अनाजी पंत' करत आहेत

रोहित यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन युवा संघर्ष यात्रेचा उल्लेख करत कोणाचेही नाव न घेता अनाजी पंत म्हणत सत्ताधारी नेत्यांवर निशाणा साधला. युवासंघर्ष यात्रेत साडेचारशे किमी पायी चालल्यानंतर एक गोष्ट जाणवली ती म्हणजे पूर्वीच्या काळात मराठेशाही एका 'अनाजी पंत' ने संपवली. आताच्या काळामध्ये 'महाराष्ट्र-धर्म' संपवण्याचे काम एक आधुनिक 'अनाजी पंत' करत आहेत, अशी खोचक टीका रोहित पवार यांनी एक्सवरील पोस्टमध्ये केली. रोहित पवार यांच्या ट्विटचा अर्थ लक्षात घेऊन भाजप समर्थकांनी त्यांच्यावर पलटवार केला आहे. तर गोपीचंद पडळकर यांनी प्रत्युत्तर देताना टीका केली आहे. 

मराठा आरक्षण जाण्यास आजोबाच जबाबदार

गोपीचंद पडळकर यांनी एक्सवर एक पोस्ट केली आहे. यामध्ये पडळकर म्हणतात की, तुमच्या माहिती करता रोहित पवार, स्वराज्याची स्थापना आठरापगड जातींनी केली. पण त्यावर घाव घालणारे सुर्याजी पिसाळ आणि  गणोजी शिर्के होते आणि देवेंद्र फडणवीस यांनी गरीब मराठा समाजाला दिलेले आरक्षण घालवणारे आपले जातीयवादी आजोबा शरद पवारच आहेत, या शब्दांत पलटवार केला. या पोस्टसह एक फोटो शेअर केला असून, त्यावर एका व्यक्तीच्या हातात मराठा आरक्षण रद्द, ओबीसी राजकीय आरक्षण रद्द, पदोन्नती आरक्षण असा कागद असल्याचे पाहायला मिळत आहे.

 

Web Title: bjp gopichand padalkar replied ncp sharad pawar group rohit pawar criticism about reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.