Beed Crime: डीजेच्या आवाजाची तक्रार केली, बीडमध्ये महिला वकिलाला सरपंचाकडून बेदम मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2025 10:50 IST2025-04-18T10:50:14+5:302025-04-18T10:50:49+5:30

Beed Crime News: डीजेच्या आवाजाचा त्रास होत असल्याने त्याची तक्रार केल्याने एका महिला वकिलाला गावच्या सरपंचाने कार्यकर्त्यांसोबत मिळून बेदम मारहाण केल्याची घटना बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील एका गावात घडली आहे.

Beed Crime News: Woman lawyer brutally beaten up by sarpanch in Beed after complaining about DJ's noise | Beed Crime: डीजेच्या आवाजाची तक्रार केली, बीडमध्ये महिला वकिलाला सरपंचाकडून बेदम मारहाण

Beed Crime: डीजेच्या आवाजाची तक्रार केली, बीडमध्ये महिला वकिलाला सरपंचाकडून बेदम मारहाण

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या झालेल्या निर्घृण हत्येच्या घटनेनंतर बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीच्या घटना  सातत्याने उघडकीस येत आहेत. दरम्यान, डीजेच्या आवाजाचा त्रास होत असल्याने त्याची तक्रार केल्याने एका महिला वकिलाला गावच्या सरपंचाने कार्यकर्त्यांसोबत मिळून बेदम मारहाण केल्याची घटना बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील एका गावात घडली आहे. लाठ्या काठ्या आणि पाईपच्या मदतीने केलेल्या या महाराहाणीत सदर महिला वकील जबर जखमी झाल्या आहेत.

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार मायग्रेनचा त्रास होत असल्याने आपल्या घरासमोरील लाऊड स्पीकर आणि पीठाची गिरण हटवण्यात यावी, अशी मागणी करत सदर महिला वकिलाने तक्रार दाखल केली होती. त्यामुळे संतप्त झालेले गावचे सरपंच आणि त्यांच्या काही कार्यकर्त्यांनी सदर महिला वकिलाला शेतामध्ये घेराव घालून अडवले, तसेच त्यांना लाठ्या काठ्या आणि पाईपच्या मदतीने बेदम मारहाण केली. या मारहाणीत जबर जखमी झालेल्या महिला वकिलाला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांनंतर आता त्यांना घरी पाठवण्यात आले आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या प्रकाराबाबत सोशल मीडियावरून प्रतिक्रिया देत संताप व्यक्त केला आहे. यासंदर्भात केलेल्या पोस्टमध्ये जितेंद्र आव्हाड म्हणाले की, अंबाजोगाई सत्र न्यायालयात वकिली करणाऱ्या महिलेला सरपंच आणि त्याच्या कार्यकर्त्यांकडून शेतात रिंगण करून काठ्या आणि जेसीबी पाईपने जबर मारहाण करण्यात आली. या महिलेने गावातील ध्वनिप्रदूषणामुळे मायग्रेनचा त्रास होत असल्याने आवाज कमी करावा ,लाऊडस्पीकर लाऊ नयेत, घरापुढील पिठाच्या गिरण्या काढाव्यात, याबाबत कार्यालयीन तक्रारी दिल्या होत्या.

आव्हाड यांनी पुढे लिहिले की, मारहाणीत जबर जखमी होऊन बेशुद्ध पडल्यानंतर या महिला वकिलांना दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. तिथे उपचार करून त्यांना घरी पाठवण्यात आलं आहे. सरपंच आणि इतर दहा पुरुषांनी मिळून एका वकील असलेल्या स्त्रीला मारहाण करणं कितपत योग्य? गावात सरपंचाचा कारभार कसा असेल कोणत्या पक्षाचा हा सरपंच आहे? असा सवालही जितेंद्र आव्हाड यांनी विचारला आहे. 

Web Title: Beed Crime News: Woman lawyer brutally beaten up by sarpanch in Beed after complaining about DJ's noise

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.