फलज्योतिष ही आयात केलेली अंधश्रद्धा

By Admin | Updated: January 14, 2015 00:47 IST2015-01-14T00:47:28+5:302015-01-14T00:47:28+5:30

नामवंत वैज्ञानिक डॉ.जयंत नारळीकर यांनी ज्योतिषशास्त्राच्या मूळ संकल्पनेवरच जोरदार प्रहार केला आहे. ग्रहताऱ्यांच्या दशा, फेरे या बाबी भारतीय प्राचीन ग्रंथांत कुठेच आढळत नाही. फलज्योतिष ही

Astrology is an imported superstition | फलज्योतिष ही आयात केलेली अंधश्रद्धा

फलज्योतिष ही आयात केलेली अंधश्रद्धा

जयंत नारळीकर : प्राचीन दाखले तपासण्याची आवश्यकता
नागपूर : नामवंत वैज्ञानिक डॉ.जयंत नारळीकर यांनी ज्योतिषशास्त्राच्या मूळ संकल्पनेवरच जोरदार प्रहार केला आहे. ग्रहताऱ्यांच्या दशा, फेरे या बाबी भारतीय प्राचीन ग्रंथांत कुठेच आढळत नाही. फलज्योतिष ही आयात केलेली अंधश्रद्धा आहे असे परखड मत त्यांनी व्यक्त केले. शिवाजी विज्ञान महाविद्यालयातर्फे आयोजित ‘इन्स्पायर’ या विज्ञान शिबिरात मार्गदर्शन करण्यासाठी ते उपराजधानीत आले होते. यावेळी ‘लोकमत’ने त्यांच्याशी संवाद साधला व विविध मुद्यांवर त्यांचे विचार जाणून घेतले.
आपल्या देशात फलज्योतिषावर मोठ्यांपासून ते अगदी सामान्य व्यक्तींचा प्रगाढ विश्वास असल्याचे दिसून येते. परंतु खरोखर शास्त्रीय कारणातून हे शास्त्र विकसित झाले आहे का याचे दाखले तपासण्याची आवश्यकता आहे. वेदांमध्ये तसेच प्राचीन ग्रंथांतून फलज्योतिष मिळालेले नाही तर ते ग्रीक संस्कृतीतून आपल्याकडे आले. या आयात केलेल्या गोष्टीला आपण नवीन स्वरूपात जगासमोर आणले. तार्किक व शास्त्रीय दृष्टीने त्यातील विज्ञान तपासण्याऐवजी अंधश्रद्धेच्या रूपातच याचा जास्त प्रसार झाला. बाहेरील देशांमध्ये फलज्योतिषावर फारसा विश्वास ठेवला जात नाही असे डॉ.नारळीकर म्हणाले.
शैक्षणिक प्रणालीत बदलांची गरज
आज देशात मूळ विज्ञानाकडे विद्यार्थ्यांना वळविण्याची आवश्यकता आहे. परंतु दुर्दैवाने त्याचे प्रमाण कमी आहे. ‘पॅकेज’च्या शर्यतीत संशोधनवृत्ती मागे पडते आहे. हे चांगले चिन्ह नाही. आधुनिकीकरणाच्या काळात देशाच्या शैक्षणिक पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल अपेक्षित आहेत. विशेषत: विज्ञान, गणित हे विषय शिकविण्याच्या वेगळ्या व आकर्षक पद्धतींची अंमलबजावणी करायला हवी. पाठांतर काही बाबींमध्ये ठीक आहे, परंतु प्रत्येकच ठिकाणी पाठांतरावर भर देणे अयोग्य आहे. ‘बेसिक’ शिकविण्याकडे कल असला पाहिजे असा सल्ला डॉ.नारळीकर यांनी दिला.(प्रतिनिधी)
वैज्ञानिकांनो, ‘इगो’ बाळगू नका!
आपल्या देशातील वैज्ञानिक लालफीतशाहीमध्ये अडकत चालले आहेत. जर योग्य दिशेने जायचे असेल तर त्यांनी ‘इगो’ न बाळगता सर्वांसाठी चर्चेची दारे उघडी ठेवली पाहिजे असे परखड मत नारळीकर यांनी व्यक्त केले. वैज्ञानिकांमध्ये असलेल्या ‘इगो’मुळे सामान्य विद्यार्थी त्यांच्यापर्यंत पोहोचून मार्गदर्शन घेऊ शकत नाही. मोकळेपणाने चर्चा करणे तर दूरच राहिले. जर विज्ञानाचा प्रसार करायचा असेल तर मनात कुठल्याही प्रकारची अढी असता कामा नये असे नारळीकर म्हणाले.

Web Title: Astrology is an imported superstition