“खमका, सक्षम अधिकारी हवा, बीड प्रकरणी तुकाराम मुंढेंकडे चार्ज द्या”; अंजली दमानियांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2025 15:54 IST2025-03-11T15:52:05+5:302025-03-11T15:54:08+5:30

Anjali Damania News: तुकाराम मुंढे सक्षम अधिकारी आहेत. आता बीडमध्ये मुंडे विरुद्ध मुंढे होऊ देत. राज्य सरकारने बीडमध्ये तुकाराम मुंढे यांना अधिकारी म्हणून पाठवले पाहिजे, असे अंजली दमानिया यांनी म्हटले आहे.

anjali damania demand that state govt should appoint tukaram mundhe for beed santosh deshmukh case | “खमका, सक्षम अधिकारी हवा, बीड प्रकरणी तुकाराम मुंढेंकडे चार्ज द्या”; अंजली दमानियांची मागणी

“खमका, सक्षम अधिकारी हवा, बीड प्रकरणी तुकाराम मुंढेंकडे चार्ज द्या”; अंजली दमानियांची मागणी

Anjali Damania News: बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात पोलिसांनी आरोप पत्र दाखल केले आहे. या प्रकरणात धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय असलेले वाल्मीक कराड मुख्य आरोपी आहेत. आरोप पत्र दाखल झाल्यानंतर धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी सुरेश धस, अंजली दमानिया यांनी चांगलीच लावून धरली होती. यानंतर आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मोठी मागणी केली आहे. बीड प्रकरणाचा चार्ज तुकाराम मुंढे या अधिकाऱ्याकडे देण्यात यावा. यासाठी मराठवाड्यात त्यांची नियुक्ती करावी, अशी अपेक्षा अंजली दमानिया यांनी व्यक्त केली आहे. 

धनंजय मुंडे आणि वाल्मीक कराड हे एकत्र गुन्हेगारीत सामील असायचे. याबद्दलचा एक पुरावा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सन २००७च्या बीडमधील प्रकरणातील एफआयआरमध्ये दोघांचीही नाव एकत्र असल्याचे दिसते आहे. पण, या प्रकरणातून पुढे धनंजय मुंडे यांचे नाव वगळण्यात आले असल्याची माहितीही समोर आली, असा मोठा दावाही अंजली दमानिया यांनी केला आहे. त्या मीडियाशी बोलत होत्या. 

खमका, सक्षम अधिकारी हवा, बीड प्रकरणी तुकाराम मुंढेंकडे चार्ज द्या

जालना, बीड आणि परभणीत अलीकडच्या काळात घडलेल्या घटना पाहता या पट्ट्यातील गुन्हेगारीला आवर घालण्यासाठी सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती करण्यात यावी. तुकाराम मुंढे यांच्यासारख्या सक्षम अधिकाऱ्याची मराठवाड्यात डिव्हिजनल  कमिशनर म्हणून नियुक्ती होणे, गरजेचे आहे. आता बीडमध्ये मुंडे विरुद्ध मुंढे व्हावे. जालना, बीड आणि परभणीतील घटना पाहता मराठवाड्याला खमका अधिकारी देण्याची गरज आहे. हा अधिकारी कोणाचेही न ऐकणारा, कोणालाही न जुमानणारा असला पाहिजे, असे अंजली दमानिया यांनी म्हटले आहे. राज्य सरकारने बीडमध्ये तुकाराम मुंढे यांना अधिकारी म्हणून पाठवले पाहिजे, अशी अपेक्षा अंजली दमानिया यांनी व्यक्त केली.

दरम्यान, बीड प्रकरणात धनंजय मुंडे, बालाजी तांदळे, शिवलिंग मोराळे, सारंग आंधळे, डॉ. वायबसे व त्यांच्या पत्नी, एसपी बारगळ, पीएसआय राजेश पाटील, पीआय महाजन, पीआय भागवत शेलार, एलसीबीचे गित्ते या सर्वांना सहआरोपी करा, अशी मागणी करत, हे प्रकरण ज्यावेळी वाढत होते त्यावेळी बालाजी तांदळे यांना दोघांना अटक करुन हे प्रकरण तिथल्या तिथे मिटवा, वाल्मीक कराड याच्यापर्यंत येऊ देऊ नका याच्यासाठी धनंजय मुंडे प्रयत्न करत होते, असा दावा दमानिया यांनी केला होता.

 

Web Title: anjali damania demand that state govt should appoint tukaram mundhe for beed santosh deshmukh case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.