कथित कॅप्टनने एस.टी बुकिंगच्या बहाण्याने राज्यातील चार आगारांना घातला गंडा, ऑनलाइन पैसे न घेण्याचे महामंडळाचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2025 13:55 IST2025-09-26T13:54:48+5:302025-09-26T13:55:43+5:30
क्यूआर कोडद्वारे चार आगारांना गंडविले

कथित कॅप्टनने एस.टी बुकिंगच्या बहाण्याने राज्यातील चार आगारांना घातला गंडा, ऑनलाइन पैसे न घेण्याचे महामंडळाचे आदेश
सांगली : सायबर गुन्हेगारांनी सर्वसामान्यांच्या खिशावर डल्ला मारायला सुरुवात केली असताना आता एसटीलाही दणका दिला आहे. स्वत:ला सैन्यातील कॅप्टन जोरावर सिंग असे म्हणविणाऱ्या भामट्याने एसटी बुकिंग करण्याच्या बहाण्याने राज्यातील चार आगारांना साडेतीन लाखांचा गंडा घातला आहे. त्यामुळे प्रशासनाने या फसवेगिरीपासून सतर्क राहण्याचे आवाहन करणारे परिपत्रक एसटी महामंडळाने जारी केले आहे.
परभणी, सोलापूर, नागपूर व चंद्रपूर विभागांत या कथित कॅप्टनने फसवेगिरी केली आहे. सैनिकांसाठी करार तत्त्वावर विशेष बस हवी असल्याचे सांगत कर्मचाऱ्यांकडून ऑनलाइन पैसे हडप केलेे आहेत. २० सप्टेंबर रोजी हिंगोली आगारातील वाहतूक निरीक्षकांना त्याने फोन केला. सैनिकांसाठी हिंगोली ते नाशिक बस हवी असल्याचे सांगितले. त्यासाठी मोबाइलवरून पैसे पाठवतो, मात्र तत्पूर्वी तुमच्या खात्यावर किमान ६९ हजार रुपये बॅलन्स आवश्यक असल्याचे सांगितले. सैन्यातील अधिकारी बोलत असल्याने तेथील लिपिकाने जोरावर सिंगने पाठविलेल्या क्यूआर कोडवर चार टप्प्यांत तब्बल १ लाख ३८ हजार ९९७ रुपये पाठविले.
दुसऱ्या घटनेत याच व्यक्तीने याचदिवशी सोलापूर आगारालाही गंडविले. सैन्यातील ४३ लोकांना सोलापुरातून खडकी येथे बैठकीसाठी नेण्यासाठी कराराने बस मागितली. सैन्याची कामगिरी असल्याने एक चालक व वाहक तातडीने बस घेऊन अशोक चौकात गेले. तेथे जोरावर सिंग याने पैसे ऑनलाइन भरतो असे सांगत वाहक व चालकाचा क्यूआर कोड व्हाॅट्सॲपवर मागून घेतला. त्यावर प्रारंभी ३० हजार रुपये पाठविले, मात्र नंतर चालकाच्या खात्यावरून ३१ हजार ५९९ व वाहकाच्या खात्यावरून ४ हजार ९९९ रुपये वळते झाल्याचे लक्षात आले.
तिसऱ्या घटनेत २२ सप्टेंबर रोजी नागपूर आगाराला ४४ जणांच्या अमरावतीपर्यंत प्रवासासाठी बस मागितली. त्याचे ४४ हजार रुपये प्रवासभाडे ऑनलाइन भरण्यासाठी क्यूआर कोड व्हाॅट्सॲपवर मागून घेतला. त्याद्वारे आगार व्यवस्थापकाच्या वैयक्तिक खात्यातून ४४ हजार रुपये काढून घेतले. चौथ्या घटनेत २० सप्टेंबर रोजी याच व्यक्तीने चंद्रपूर आगारातून सोनगावला जाण्यासाठी ४५ प्रवाशांसाठी बस मागितली. पैसे ऑनलाइन देण्यासाठी क्यूआर कोड मागून घेतला. त्यावरून १ लाख २३ हजार रुपये काढून घेतले. फसवेगिरीच्या या चारही घटनांत एकूण ३ लाख ४२ हजार ५९६ रुपयांना गंडविण्यात आले आहे. याबाबत स्थानिक पोलिसांच्या सायबर सेलकडे तक्रार देण्यात आली आहे.
दक्षता विभागाने आगारांना केले सतर्क
फसवेगिरीच्या या घटनांनंतर एसटीच्या सुरक्षा व दक्षता विभागाने राज्यभरातील आगारांना सतर्कतेचे आदेश दिले आहेत. एसटी बुकिंगसाठी फक्त महामंडळाच्या खात्यातच पैसे घ्यावेत. वैयक्तिक खात्याचा क्यूआर कोड, एडीपी, पासवर्ड देऊ नये. फसवणूक झाल्यास पोलिसांच्या सायबर सेलला संपर्क करावा किंवा १९३० या क्रमांकावर तक्रार करावी, असे आदेशात म्हटले आहे.