Ajit Pawar speaks at paani foundation event in pune | काहीजण बोलघेवड्या सारखं बोलतात; अजित पवारांचा राज ठाकरेंना टोला

काहीजण बोलघेवड्या सारखं बोलतात; अजित पवारांचा राज ठाकरेंना टोला

पुणे : आमिर जी तुम्ही खुप चांगलं काम करत आहात. परंतु कुठल्याही पक्षाच्या व्यासपीठावर जाऊन तुमच्यावर शिक्का मारून घेऊ नका. तुमच्यावर कोणाचा शिक्का नाही म्हणून ही जनता आज तुम्हाला प्रतिसाद देत आहे. असा सल्ला राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आमिर खान यांना दिला. तसेच काहीजण बोलघेवड्या सारखं बोलतात, त्यांना केवळ सभा घेऊन जायच्या असतात असा टोलाही त्यांनी राज ठाकरे यांना लगावला.

पानी फाऊंडेशन च्या सत्यमेव जयते वॉटर कप सोहळ्यात पवार बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखेपाटील, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, जलसंधारण मंत्री राम शिंदे, राज्यमंत्री विजय शिवतारे, अभिनेता आमिर खान, किरण राव, पानी फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित भटकळ आदी उपस्तिथ होते.

(पाण्यासाठी सगळ्यांचा एकच पक्ष - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस)

(...जेवढं पाणी मुरलं तेवढ्यात दुष्काळ संपला असता - राज ठाकरे)

अजित पवार म्हणाले, आम्ही सर्व राजकीय पक्षाचा शिक्का असलेले कार्यकर्ते आहोत. आज जनता तुम्हाला प्रतिसाद देतीये कारण तुमच्यावर कुठल्याही पक्षाचा शिक्का नाही. येणारं वर्ष निवडणुकांचं असलं तरी तुमचा 2019 चा वॉटर कप झाला पाहिजे. राज्यातील काही धरणं आज 100 टक्के भरली आहेत. परंतु काही जिल्ह्यात अजूनही पाण्याची गरज आहे. भूगर्भातील पाणी वाढते तेव्हा शेतकरी जास्त पाणी लागणारी पिकं घेतात. त्यामुळे पीक पद्धतीचा विचार करणेही आवश्यक आहे. पाण्याचा उपसा कसा होतो, हे पाहणं गरजेचं आहे. श्रमदान, लोकसहभागाचं सातत्य टिकलं पाहिजे. आमिर खान यांनी या उपक्रमासाठी महाराष्ट्र निवडला याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. यावेळी सत्यमेव जयते हा कार्यक्रम पुन्हा सुरु करण्याची विनंती सुद्धा अजित पवार यांनी आमिर खान यांना केली. तसेच किरण राव करेल तेच गाव करेल अशी नवीन म्हण सुद्धा अजित पवार यांनी यावेळी तयार केली.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Ajit Pawar speaks at paani foundation event in pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.