विमान गोल फिरून आले अन् कोसळले... प्रत्यक्षदर्शीने सांगितला अपघात कसा झाला
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2026 10:51 IST2026-01-28T10:49:52+5:302026-01-28T10:51:45+5:30
Ajit Pawar plane crash Baramati: अजित पवारांचे विमान विमानतळावर उतरत होते, परंतू ते पुन्हा वर गेले आणि गोल गोल फिरू लागले. आम्ही शेतात काम करत होतो. आम्ही ते विमान पाहिले. अचानक खाली आले आणि कोसळले आणि स्फोट झाले. विमानाचे भाग आमच्या घरापर्यंत उडाले, असे प्रत्यक्षदर्शी शेतकरी महिलेने सांगितले.

विमान गोल फिरून आले अन् कोसळले... प्रत्यक्षदर्शीने सांगितला अपघात कसा झाला
बारामती (पुणे): महाराष्ट्राच्या राजकारणातील एक धडाडीचे आणि कणखर नेतृत्व, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज सकाळी बारामतीमध्ये झालेल्या एका भीषण विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. 'VSR' कंपनीचे खासगी विमान लँडिंग करत असताना तांत्रिक बिघाडामुळे हवेतच गोल फिरले आणि जमिनीवर आदळताच त्याचे तुकडे उडाले. या भीषण दुर्घटनेत अजित पवारांसह विमानातील सर्व ५ जणांचा अंत झाला आहे.
"विमानाचे भाग आमच्या घरापर्यंत उडाले"
अपघातावेळी शेतात काम करणाऱ्या एका प्रत्यक्षदर्शी महिलेने तो भीषण प्रसंग सांगितला. "विमान विमानतळावर उतरत होते, पण अचानक ते पुन्हा आकाशात वर गेले. हवेतच ते दोन-तीन वेळा गोल फिरले आणि वेगाने खाली कोसळले. जमिनीवर आदळताच विमानाचे एकामागून एक मोठे स्फोट झाले. विमानाचे लोखंडी भाग आणि अवशेष इतक्या जोरात उडाले की ते आमच्या घराच्या छतापर्यंत येऊन पडले," असे त्यांनी घाबरलेल्या अवस्थेत सांगितले.
विमानातील ५ प्रवासी : १. माननीय अजित दादा पवार साहेब (उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र) २. विदीप जाधव (मुंबई पोलीस, सुरक्षा अधिकारी - PSO) ३. कॅप्टन सुमित कपूर (पायलट) ४. कॅप्टन संभवी पाठक (को-पायलट) ५. पिंकी माळी (फ्लाईट अटेंडंट)
कसा घडला अपघात? (वेळेचा घटनाक्रम):
सकाळी ०८:१० - विमानाने मुंबईवरून बारामतीसाठी टेक-ऑफ केले.
सकाळी ०८:४५ - विमान बारामती एअरस्ट्रिपच्या अगदी जवळ आले होते.
सकाळी ०८:५० - लँडिंगच्या शेवटच्या क्षणी विमानाने नियंत्रण गमावले. वैमानिकांनी विमान पुन्हा वर नेण्याचा प्रयत्न केला, मात्र तांत्रिक बिघाडामुळे विमान हवेतच अनियंत्रित झाले आणि 'गोजुबावी' परिसरातील शेतात कोसळले.
राज्यावर शोककळा: अजित पवार आज बारामतीत जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी ४ सभांना संबोधित करणार होते. मात्र, त्यांच्या बालेकिल्ल्यातच हा काळाचा घाला पडला. घटनेची माहिती मिळताच खासदार सुप्रिया सुळे, पार्थ पवार आणि संपूर्ण पवार कुटुंब बारामतीकडे रवाना झाले आहे.