राष्ट्रवादी काँग्रेसचे १९ सप्टेंबरला नागपूरमध्ये चिंतन शिबिर; कोणकोणत्या विषयांवर होणार चर्चा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2025 16:04 IST2025-09-05T16:04:15+5:302025-09-05T16:04:34+5:30

हे शिबिर राजकीय भविष्याला आकार देणारे असेही तटकरे म्हणाले

Ajit Pawar led NCP to hold Think tank meet in Nagpur on September 19 said Sunil Tatkare | राष्ट्रवादी काँग्रेसचे १९ सप्टेंबरला नागपूरमध्ये चिंतन शिबिर; कोणकोणत्या विषयांवर होणार चर्चा?

राष्ट्रवादी काँग्रेसचे १९ सप्टेंबरला नागपूरमध्ये चिंतन शिबिर; कोणकोणत्या विषयांवर होणार चर्चा?

अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शुक्रवारी, १९ सप्टेंबर २०२५ रोजी नागपूर येथे चिंतन शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. या शिबिरामध्ये पक्षाचे वरिष्ठ नेते, मंत्री, आजी-माजी आमदार, आजी-माजी खासदार, सर्व सेलचे प्रदेशाध्यक्ष, सर्व जिल्हाध्यक्ष, राष्ट्रीय कार्यकारिणीचे नेते यांचा समावेश असणार आहे.

युवकांचे बदलत्या आकांक्षांचे प्रश्न, समाजातील विविध घटकांच्या अपेक्षा, तंत्रज्ञान आणि समाज, युवकांची जीवनशैली आणि अपेक्षा, या गोष्टींना सामोरे जाण्याचे धोरण नव्याने विकसित करण्याचा प्रयत्न या चिंतन शिबिरात केला जाणार आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात असलेल्या गावात प्रत्येक घरात पक्षाची विचारसरणी, भूमिका आणि योजना पोचवण्याचा धोरणावरही या चिंतन शिबिरात सांगोपांग चर्चा केली जाणार आहे असेही सुनिल तटकरे यांनी स्पष्ट केले.

मूल्याधिष्ठीत पण आधुनिक गरजांना प्रतिसाद देणारी भविष्यकालीन राष्ट्रवादी घडवणे हे या शिबिराचे मुख्य ध्येय आहे. पक्षाचे हे निव्वळ शिबिर नसून महाराष्ट्र आणि देशाच्या राजकीय भविष्याला आकार देणारा एक महत्त्वाचा टप्पा राष्ट्रवादी काँग्रेसच्या आकाराच्या जडणघडणीत राजकीय प्रवासाचा ठरणार आहे असेही सुनिल तटकरे म्हणाले.

या चिंतन शिबिरात जे राज्यव्यापी धोरण निश्चित करु त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन विस्तृत चर्चा आणि आगामी काळातील रणनीती याबाबतची सुरुवात कधी करणार आहोत हे योग्य वेळी सांगणार आहोत  असेही सुनिल तटकरे यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेसचे कोषाध्यक्ष आमदार शिवाजीराव गर्जे, प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे, मुंबई कार्याध्यक्ष सिध्दार्थ कांबळे, प्रदेश सरचिटणीस लतिफ तांबोळी आदी उपस्थित होते.

 

Web Title: Ajit Pawar led NCP to hold Think tank meet in Nagpur on September 19 said Sunil Tatkare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.