कृषिमंत्रिपदाची सर्वात पहिली ऑफर अजित पवारांनी मला दिली होती; छगन भुजबळांचा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2025 13:54 IST2025-08-01T13:50:29+5:302025-08-01T13:54:36+5:30

Chhagan Bhujbal Ajit Pawar: मंत्रिमंडळात दोन खात्यांची अदलाबदल करण्यात आली. अजित पवारांनी घेतलेल्या या निर्णयाबद्दल बोलताना छगन भुजबळ यांनी एक गौप्यस्फोट केला. 

Ajit Pawar gave me the first offer of the Agriculture Minister's post, but...; Chhagan Bhujbal's revelation | कृषिमंत्रिपदाची सर्वात पहिली ऑफर अजित पवारांनी मला दिली होती; छगन भुजबळांचा गौप्यस्फोट

कृषिमंत्रिपदाची सर्वात पहिली ऑफर अजित पवारांनी मला दिली होती; छगन भुजबळांचा गौप्यस्फोट

Chhagan Bhujbal Agriculture Ministry News: विधानसभेचे कामकाज सुरू असताना पत्त्यांचा गेम खेळत बसलेल्या कॅबिनेट मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडील कृषि खाते काढून घेण्यात आले. अजित पवारांनी पक्षातीलच दत्ता भरणे यांच्याकडे या खात्याची जबाबदारी दिली, तर कोकाटेंकडे आता क्रीडा खाते देण्यात आले आहे. पण, खात्यांच्या या अदलाबदलीबद्दल बोलताना कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांनी एक गौप्यस्फोट केला. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

माणिकराव कोकाटे यांच्याकडील कृषी खाते काढून घेण्यात आल्याच्या मुद्द्यावर नाशिकमध्ये माध्यमांशी बोलताना छगन भुजबळ म्हणाले, "मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हा निर्णय घेतात. मी अधिक बोलणं योग्य राहणार नाही. याआधी देखील अनेक कृषिमंत्री राहिले आहेत. शरद पवारांनी देशाचे कृषिमंत्री म्हणून काम केलं आहे. त्यामुळे कोणत्याही खात्यात काही अडचण राहत नाही. विरोधकांचे काम आहे आणि त्यामुळे ते राजीनामा मागतात."

अजित पवारांनी सर्वात आधी मला ऑफर दिली होती -भुजबळ

"कृषिमंत्रिपदाची सर्वात पहिली ऑफर अजित पवारांनी मला दिली होती. भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेसोबत सहभागी झाल्यानंतर अजित पवारांनी अर्थ खाते त्यांच्याकडे ठेवले. सर्वात आधी कृषी खात्याची ऑफर मला दिली होती. पण, कृषिमंत्री ग्रामीण भागातील असला पाहिजे, तर जास्त न्याय देऊ शकतो, अशी माझी भूमिका होती. कुठलेही खाते लहान किंवा मोठे नसते. आपण काय काम करतो, त्यावर अवलंबून असते",असा अप्रत्यक्ष चिमटाही त्यांनी माणिकराव कोकाटेंना काढला. 

राष्ट्रवादीत फूट पडून अजित पवारांच्या नेतृत्वाखाली एक गट भाजप-शिंदेंच्या शिवसेना सरकारमध्ये सामील झाला होता. त्यावेळची झालेल्या मंत्रि‍पदाच्या चर्चेबद्दल भुजबळ म्हणाले, "माझ्या समोर सर्व खाती ठेवली होती. मला कृषी खाते घेण्यासाठी आग्रह केला होता. मोठे खाते घेण्यासाठी खूप आग्रह केला गेला. पण, मी ग्रामीण भागातील लोकांना हे खातं द्या असं सांगितलं."

"दत्ता भरणे कृषिमंत्री पदाला न्याय देतील"

"माझे राजकारण मुंबईत झाले आहे. आम्ही शेतकरी प्रश्नावर मागे उभे राहतो, पण त्याची बारीक सारीक माहिती देणारी माणसे ग्रामीण भागात आहेत. त्यामुळे दत्ता भरणे न्याय देतील. बालपणापासून जो ग्रामीण भागात राहिला आहे, तोच जास्त न्याय देऊ शकतो. दत्ता भरणे यांना अडचण येईल असे वाटत नाही", असेही भुजबळ खातेबदलाबद्दल बोलताना म्हणाले. 

Web Title: Ajit Pawar gave me the first offer of the Agriculture Minister's post, but...; Chhagan Bhujbal's revelation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.