"असे वाटते आत्ता दादांचा फोन येईल", अजित पवारांच्या निधनाने धनंजय मुंडेंना अश्रू अनावर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2026 12:34 IST2026-01-28T12:33:53+5:302026-01-28T12:34:20+5:30
Ajit Pawar Death in Plane Crash: "वडील गेल्यानंतर दादांनी वडील नसल्याचे कधी जाणवू दिले नाही. माझे दादा मला पोरका करून गेले... "

"असे वाटते आत्ता दादांचा फोन येईल", अजित पवारांच्या निधनाने धनंजय मुंडेंना अश्रू अनावर
Ajit Pawar Death in Plane Crash: महाराष्ट्राच्या राजकारणासाठी आज 'काळा दिवस' म्हणावा लागेल. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सकाळी बारामतीतविमान अपघातात दुःखद निधन झाले. या अपघातात अजित पवार यांच्यासह विमानातील एकूण पाच जणांचा मृत्यू झाला. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या प्रचारासाठी अजित पवार यांच्या आज बारामती येथे सभा होणार होत्या, त्या सभांसाठी ते सकाळी मुंबईहून विमानाने बारामती येथे येत होते.
मिळालेल्या माहितीनुसार, हे चार्टर विमान बारामती विमान तळावर उतरत असताना रनवेवरुन घसरले अन् जवळच्या शेतात कोसळले. विमान कोसळताच आग लागली, ज्यात अजित पवारांसह विमानातील इतरांचा मृत्यू झाला. अजित पवारांच्या अकाली निधनावर देशभरातून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांना माहिती मिळताच ते बारामतीकडे रवाना झाले.
धनंजय मुंडेना अश्रू अनावर...
दरम्यान, अजित पवारांच्या दुर्दैवी अपघाताचे वृत्त समजताच धनंजय मुंडे हे तातडीने बारामती कडे रवाना झाले असून प्रवासादरम्यान आपल्या एका सहकाऱ्यांशी बोलताना त्यांना अश्रू अनावर झाले. अजितदादांच्या निधनाबद्दल मुंडेंनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले की, "आज पुन्हा पोरका झालो... माझे दादा मला पोरका करून गेले... माझे वडील गेल्यानंतर दादांनी मला वडील नसल्याचे कधी जाणवू दिले नाही. माझे आणि दादांचे नाते शब्दात सांगू शकत नाही."
"संपूर्ण महाराष्ट्राच्या विकासाचे स्वप्न उराशी घेऊन झोपणार आणि भल्या पहाटे ती स्वप्नं पूर्ण करण्यासाठी कामाला लागणारा नेता; वेळेचे नियोजन, शिस्त यातून विकासाचा दरारा महाराष्ट्रात उभा करणारे दादा आज महाराष्ट्रासह संपूर्ण देशाला स्तब्ध करून आणि आम्हा सर्वांना दुःखाच्या छायेत सोडून निघून गेले...दादांचे अकाली निधन ही घटनाच मुळात हृदयाला न पटणारी आहे. आमचे राजकीय अस्तित्व दादांच्या जीवावर होते... त्यामुळे अजूनही असे वाटते की, आता दादांचा फोन येईल आणि म्हणतील, धनंजय वेळेवर ये बरका...त्यामुळे श्रद्धांजली हा शब्दच फुटत नाहीये...देशाची, राज्याची, पक्षाची, माझ्या बीड जिल्ह्याची आणि माझी कधीही न भरून निघणारी हानी..." अशी प्रतिक्रिया धनंजय मुंडेंनी व्यक्त केली.
अजित पवारांची कारकीर्द
अजित पवार यांनी आपल्या दीर्घ राजकीय कारकिर्दीमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणावर ठसा उमटवला होता. काका शदर पवार यांच्या पावलावर पाऊल ठेवत राजकारणात आलेल्या अजित पवार यांनी सहकार क्षेत्रातून आपल्या कारकीर्दीची सुरूवात केली. पुढे १९९१ मध्ये ते बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले होते. मात्र ते खऱ्या अर्थाने रुळले ते महाराष्ट्राच्या राजकारणात बारामती विधानसभा मतदारसंघातून अजित पवार हे सलग आमदार म्हणून निवडून आले. तसेच अर्थ, नियोजन, जलसंपदा, ऊर्जा अशा प्रमुख मंत्रालयांची जबाबदारी त्यांनी सांभाळली होती. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्रिपद सर्वाधिक काळ सांभाळण्याचा विक्रम अजित पवार यांच्या नावावर होता. तसेच सध्या राज्यातील सत्ताधारी महायुती सरकारमध्ये अजित पवार हे उपमुख्यमंत्री होते.