On that 'aggressive' tweet of Parth Pawar, Chandrakant Patil said, "This path is towards 'Satyamev Jayate' | पार्थ पवारांच्या 'त्या' आक्रमक ट्विटवर चंद्रकांत पाटील म्हणाले, ही तर 'सत्यमेव जयते'कडे वाटचाल

पार्थ पवारांच्या 'त्या' आक्रमक ट्विटवर चंद्रकांत पाटील म्हणाले, ही तर 'सत्यमेव जयते'कडे वाटचाल

पुणे: सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर मराठा समाज आक्रमक झाला आहे. राज्यात ठिकठिकाणी रस्त्यावर उतरत मोर्चे, आंदोलने, निदर्शने यांच्या माध्यमातून मराठा समाज व्यक्त होत आहे. त्यातच आरक्षणाच्या मुद्दयावरून बीड जिल्ह्यातील एका विद्यार्थ्यांने आत्महत्या केली आहे. मात्र या घटनेवर पार्थ पवार यांनी केलेल्या 'त्या' आक्रमक ट्विटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली.त्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व राम कदम यांनी घेतलेल्या जाहीर भूमिकांमुळे पार्थ पवार यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांनी देखील चांगलाच जोर पकडला.     

बीड जिल्ह्यातील केतुरा येथील विवेक कल्याण रहाडे (१८) या विद्यार्थ्याने ''मी मेल्यानंतर तरी केंद्र आणि राज्य सरकारला मराठ्यांच्या मुलांची कीव येईल आणि तेव्हा माझे मरण सार्थक होईल, अशी चिठ्ठी लिहून गळफास घेतला. बारावीला चांगले गुण मिळाल्यानंतर त्याने नीटची परीक्षा दिली होती. मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने वैद्यकीय प्रवेशासाठी निवड होणार नसल्याचे लिहून त्याने हे टोकाचे पाऊल उचलले. 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी बीड जिल्ह्यातील घटनेवर ''दुर्देवी घटनांचे सत्र सुरू होण्याआधीच मराठा नेत्यांनी जागं व्हावं आणि आरक्षणासाठी लढायला हवं,'' अशा आशयाचे ट्विट केले. त्यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे भाजपला ठाकरे सरकारवर निशाणा साधण्याची संधी मिळाली. 

पुण्यात खासदार गिरीश बापट व भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत पदवीधर निवडणूक मतदार नोंदणी अभियानाला गुरुवारी सुरूवात झाली. त्यावेळी ते बोलत होते. 

पाटील म्हणाले, पार्थ पवार यांची 'सत्यमेव जयते'कडे वाटचाल सुरू आहे. पण याचवेळी पार्थ यांच्या भाजप प्रवेशावर 'असा कुठलाही प्रस्ताव अजूनतरी आलेला नसल्याचे स्पष्ट केले. तसेच मराठा आरक्षणाचा अध्यादेश केंद्राला काढता येणे कदापि शक्य नाही. आरक्षण हा राज्याचा विषय आहे. ही बाब इतकी वर्ष राजकारणात सक्रिय असणाऱ्या शरद पवारांना माहिती नाही का? असा सवाल उपस्थित करत पाटील यांनी पवारांवर टीकास्त्र सोडले. 

तर दुसरीकडे भाजप प्रवक्ते व आमदार राम कदम यांनी देखील पार्थ यांच्या भूमिकेला पाठिंबा दर्शवला.  तसेच पार्थ यांच्या मागणीची राज्य सरकार यावेळी तरी गंभीर दखल घेणार की पुन्हा कवडीची किंमत देणार?' असा खोचक प्रश्न विचारत महाविकास आघाडीवर टीका केली आहे. 


 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: On that 'aggressive' tweet of Parth Pawar, Chandrakant Patil said, "This path is towards 'Satyamev Jayate'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.