सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2025 17:50 IST2025-08-21T16:13:51+5:302025-08-21T17:50:47+5:30
सप्टेंबरनंतर अनेक राजकीय घडामोडी बदलताना दिसतील. केंद्र सरकारमध्ये खूप उलथापालथ होताना दिसते असं त्यांनी सांगितले.

सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
मुंबई - येत्या सप्टेंबर महिन्यात उपराष्ट्रपतिपदाची निवडणूक पार पडणार आहे. सत्ताधारी NDA घटक पक्षांमध्ये सर्व सुरळीत आहे अशी चिन्हे नाहीत. तिथेच बऱ्याच उलथापालथी घडण्याची चिन्हे आहेत. त्याशिवाय एनडीएच्या उमेदवाराला सत्तेतील घटक पक्ष फारशी मदत करताना दिसत नाहीत. त्यामुळेच येत्या सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात बरेच राजकीय बदल घडतील अशी शक्यता असल्याचा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे.
अंजली दमानिया यांनी म्हटलं की, केंद्र सरकारमध्ये सध्याच्या घडीला फार मोठे बदल घडताना दिसतात. तिथे सत्तेची गणिते बिघडलेली दिसतात. उपराष्ट्रपतिपदाची निवडणूक आहे, त्यात NDA उमेदवाराला सत्तेतील घटक पक्ष समर्थन देताना दिसत नाहीत. त्यामुळेच मविआ नेत्यांसोबत बोलण्याची जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांना दिली आहे. त्यात एकनाथ शिंदे स्वत:ची ताकद दाखवण्याचा प्रयत्न करताना दिसतायेत. कॅबिनेटच्या बैठकीलाही ते गेले नाहीत असं बोलले जाते. अनेक गोष्टी आणि अनेक बदल येत्या काही दिवसात घडताना दिसतील असं त्यांनी म्हटलं.
तसेच सप्टेंबरनंतर अनेक राजकीय घडामोडी बदलताना दिसतील. केंद्र सरकारमध्ये खूप उलथापालथ होताना दिसते. त्याचेच पडसाद महाराष्ट्रात उमटताना दिसतात. देवेंद्र फडणवीसांना त्यासाठीच जबाबदारी दिलेली आहे. आताच्या घटकेला एकनाथ शिंदे यांना स्वत:सोबत ठेवण्याचा पूर्ण प्रयत्न करा. सध्याच्या घडामोडीत एकनाथ शिंदे यांचा भाव वाढेल परंतु सप्टेंबरनंतर काय होईल सांगता येत नाही असंही अंजली दमानिया यांनी सांगितले. टीव्ही ९ मराठीच्या मुलाखतीत त्या बोलत होत्या.
राज ठाकरे भाजपासोबत जातील...
दरम्यान, राज ठाकरे हे भाजपासोबत जातील असं वाटते. उद्धव ठाकरेंसोबत त्यांना भवितव्य नाही असं स्पष्टपणे दिसते. राज ठाकरे कधी ना कधी उद्धव ठाकरेंना तोंडघशी पाडतील. राज ठाकरे उद्धव ठाकरेंसोबत जाणार नाहीत हे चित्र मला दिसत होते परंतु मी स्पष्ट बोलले नव्हते. आताच्या घटकेला भाजपासमोर स्वत:चा भाव वाढवण्यासाठी राज ठाकरे यांनी काही विधाने केली असतील. परंतु त्यांना उद्धव ठाकरेंसोबत जाण्याची कुठलीही इच्छा नसावी असं स्पष्टपणे वाटते असंही अंजली दमानिया यांनी म्हटलं आहे.