प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2025 05:35 IST2025-12-16T05:33:28+5:302025-12-16T05:35:08+5:30
अखेर बिगुल वाजला : २९ महापालिकांमधील २,८६९ जागांसाठी लढत; १ जुलैची मतदार यादी ग्राह्य पुढे काय ? : उमेदवारी अर्ज ऑनलाइन नव्हे तर ऑफलाइनच, आता लक्ष राजकीय युती अन् आघाड्यांकडे

प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
मुंबई : मुंबईसह २९ महापालिकांच्याvनिवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने अखेर सोमवारी जाहीर केला. १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणी होईल. नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांत जशा वेगवेगळ्या आघाड्या झाल्या होत्या, तशाच आता महापालिका निवडणुकांतही होणार का याकडे सगळ्यांचे लक्ष असेल.
मुंबई महापालिकेच्या २२७ जागांसह एकूण २,८६९ जागांसाठी निवडणूक होत आहे. सर्व महापालिका क्षेत्रांत आचारसंहिता लागू झाल्याची घोषणा राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सह्याद्री अतिथीगृह येथील पत्रकार परिषदेत केली.
या निवडणुकांत भाजप-शिंदेसेनेत युती असेल पण मित्रपक्ष अजित पवार गट वेगळा लढणार याचे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. तर दुसरीकडे महाविकास आघाडी एकत्र लढणार का हे स्पष्ट झालेले नाही.

ईव्हीएमवरच मतदान; व्हीव्हीपॅटचा वापर नाहीच
१. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी ईव्हीएमद्वारे मतदान होईल. मात्र, यावेळी व्हीव्हीपॅट डिव्हाइस नसेल, असे राज्य निवडणूक आयुक्त वाघमारे यांनी सांगितले.
२. ज्येष्ठ नागरिकांचे मतदान करण्यासाठी व्होटिंग मशीन घरी घेऊन जाण्याची सुविधाही यावेळी नसेल, असेही आयोगाने स्पष्ट केले.
एकूण मतदार - ३,४८,७८,०१७
इतर मतदार - ४,५९६
पुरुष मतदार - १,८१,९३,६६६
महिला मतदार- १,६६,७९,७५५
एकूण मतदान केंद्रे- ३९,१४७
४३,९५८ - कंट्रोल युनिट
८७,९१६ - बॅलेट युनिट
बृहन्मुंबई महापालिकेसाठी किती मतदान केंद्रे ?
२२,६९८ - बॅलेट युनिट
११,३४९ - कंट्रोल युनिट
१०,१११ - एकूण मतदान केंद्रे
एकूण प्रभाग - ८९३
एकूण जागा - २,८९६
महिला - १,४४२
अनुसूचित जाती - ३४१
अनुसूचित जमाती - ७७
नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग - ७५९
किती कर्मचारी तैनात ?
महापालिकांच्या निवडणुकांसाठी सुमारे २२० निवडणूक निर्णय अधिकारी आणि ८७० सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची पूर्तता करण्यात आली आहे. सुमारे १ लाख ९६ हजार ६०५ कर्मचारी देखील निवडणूक प्रक्रियेसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत.