निवडणूक आयोगाविरोधात १ नोव्हेंबरला मुंबईत निघणार विराट मोर्चा; सर्वपक्षीय विरोधकांची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2025 16:48 IST2025-10-19T16:46:56+5:302025-10-19T16:48:14+5:30
महाराष्ट्राच्या जिल्हाजिल्ह्यातून मतदानाचा अधिकार गमावलेले लाखो लोक मुंबईत येतील. ही ताकद देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृह मंत्री अमित शाह यांना दाखवून देतील असं संजय राऊत यांनी म्हटलं.

निवडणूक आयोगाविरोधात १ नोव्हेंबरला मुंबईत निघणार विराट मोर्चा; सर्वपक्षीय विरोधकांची घोषणा
मुंबई - निवडणुकीतील मॅच फिक्सिंगविरोधात विरोधकांचा लढा आहे. घुसखोर मतदारांना यादीतून बाहेर काढणे ही लोकशाहीची गरज आहे मात्र निवडणूक आयोग विरोधकांचे आक्षेप गांभीर्याने घेत नाही. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या मनमानी आणि भ्रष्ट कारभाराविरोधात येत्या १ नोव्हेंबरला मुंबईत सर्वपक्षीय विरोधकांचा विराट मोर्चा काढण्यात येईल. या मोर्चातून निवडणूक आयोगाला दणका देण्याचं काम विरोधक करतील अशी घोषणा खासदार संजय राऊत यांनी केली आहे. शिवसेना भवन येथे झालेल्या सर्वपक्षीय विरोधकांच्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील, मनसेचे नेते बाळा नांदगावकर, काँग्रेस नेते सचिन सावंत, कम्युनिस्ट नेते प्रकाश रेड्डी यांच्यासह इतर नेते उपस्थित होते.
या पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्रातील मतदार यादीत घुसलेले ९६ लाख म्हणजे जवळपास १ कोटी मतदार यांना बाहेर काढले पाहिजे. पैठणच्या आमदारांनी जाहीररित्या २० हजार मतदार बाहेरून आणले असं सांगितले. दुबार मतदारांची नावे देऊनही ती यादीतून काढली जात नाहीत असं सत्ताधारी भाजपाच्या आमदार मंदा म्हात्रे सांगतात. बुलढाणा जिल्ह्यात १ लाखाहून अधिक बोगस मतदार नोंदवले गेले असं तिथले आमदार संजय गायकवाड सांगतात. निवडणूक मतदानात घोटाळा करून हे लोक सत्तेत आले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व प्रमुख पक्ष या मतदार यादीतील घोटाळ्याविरोधात लढत आहेत. निवडणूक आयोगाने गुन्हेगारी कृत्य केले आहे. अधिकारी ऐकायला तयार नाहीत. निवडणूक आयोगाला दणका द्यावा लागेल आणि तो रस्त्यावर उतरून द्यावा लागेल. निवडणूक आयोगाच्या मनमानी आणि भ्रष्ट कारभाराविरोधात १ नोव्हेंबरला मुंबईत सर्वपक्षीय विराट मोर्चा निघेल. महाराष्ट्राच्या जिल्हाजिल्ह्यातून मतदानाचा अधिकार गमावलेले लाखो लोक मुंबईत येतील. ही ताकद देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृह मंत्री अमित शाह यांना दाखवून देतील. या मोर्चाचे नेतृत्व शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते करतील असं त्यांनी सांगितले.
त्याशिवाय निवडणूक आयोगाला दणका देणे गरजेचे आहे. महाराष्ट्र झोपलेला नाही. तुम्ही आव्हान देत असाल तर ते आव्हान स्वीकारण्याची आमची तयारी आहे. त्यामुळे १ नोव्हेंबर हा महाराष्ट्रासाठी आणि देशाच्या लोकशाहीसाठी महत्त्वाचा दिवस असेल. असाच मोर्चा आम्ही दिल्लीत राहुल गांधी यांच्या नेतृत्वात दिल्लीत निवडणूक आयोगासमोर नेला होता. तेव्हाही सर्व पक्षीय नेते रस्त्यावर उतरले होते. त्यात सर्व खासदार, नेते होते. त्याच धर्तीवर महाराष्ट्रात मोर्चा निघेल. या मोर्चाला प्रत्येक विरोधी पक्षाचा पाठिंबा आहे असंही संजय राऊत यांनी म्हटलं.
दरम्यान, विरोधकांनी घेतलेले जे आक्षेप आहेत, मतदार यादीतील गोंधळ असेल किंवा घोटाळा असेल अशा भावना केवळ विरोधकांच्या नाही तर जनतेच्या मनात आहेत. सामान्य लोकांना मतदानावर विश्वास असावा, निवडणूक आयोगाची विश्वासार्हता राहिली पाहिजे. मात्र निवडणूक आयोगाने यादीत घोळ असूनही त्याकडे डोळेझाक करत आहेत. त्यामुळे विरोधकांच्या मोर्चात मनसे ताकदीने यात सहभागी होणार आहे. निवडणूक आयुक्तांना भेटल्यानंतर सर्व पक्षाने आपापल्या भूमिका मांडल्या होत्या. त्याचे पुरावे दिले होते. मतदार यादीत घोळ आहे हे निवडणूक आयोगाला पटले आहे मात्र कार्यवाही होत नाही. लोकशाही वाचवण्यासाठी सर्वसामान्यांची ताकद दिसणे गरजेचे आहे. या मोर्चाला लोकांनीही मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावं असं मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी आवाहन केले.
"लोकशाही निस्तनाबूत करण्याचा डाव"
राहुल गांधी यांनी भाजपा आणि निवडणूक आयोगाच्या संगनमताने जी मतचोरी सुरू आहे ती देशासमोर आणली आहे. देशपातळीवर आता याचा विरोध होत आहे. महाराष्ट्रात या प्रकाराचा विरोध सुरू झाला आहे. राज्य निवडणूक आयोगाकडे सर्व पक्षीय विरोधकांचे शिष्टमंडळ घेऊन गेलो होतो, परंतु विरोधी पक्षांच्या मताला राज्य आणि केंद्रीय निवडणूक आयोगाकडून फार किंमत दिली नाही. विरोधकांनी जे आक्षेप नोंदवले त्यावरून निवडणूक आयोगाने हात झटकले आहेत. मतदार यादीत बऱ्याच चुका आहेत. अद्यापही ही यादी विरोधकांना दिली जात नाही. लोकशाही प्रक्रिया निस्तनाबूत करण्याचा हा डाव आहे. विरोधी पक्ष या मोर्चात संपूर्ण शक्तीने उतरेल - सचिन सावंत, काँग्रेस नेते
"निवडणूक आयोग माहिती दडवतंय"
निवडणूक आयोगाने त्यांच्या चूका दुरुस्त कराव्यात. निवडणूक आयोगाने विरोधकांचे आक्षेप होते, त्याला उत्तर देणे गरजेचे होते. मात्र त्यांनी काही उत्तर दिले नाही. मतदार यादीत दुबार नोंदणी, चुकीचे पत्ते, चुकीचे वय असलेली नावे आहेत. देशात पारदर्शकता तयार व्हावी यासाठी माहितीचा अधिकार आला, परंतु निवडणूक आयोग अनेक माहिती दडवून ठेवते आहे. महाराष्ट्रात ज्यांना लोकशाहीबद्दल आस्था आहे. मतदार यादी निवडणुकीचा पाया आहे. हा पाया भक्कम करण्यासाठी सर्वांनी सर्वपक्षीय मोर्चात सहभागी व्हावे असं आवाहन राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी केले.