राज्यातील ८० हजार शाळा आज बंद; शिक्षकांचा एल्गार, वेतन कपातीच्या आदेशानंतरही शिक्षक संघटना ‘बंद’वर ठाम
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2025 05:50 IST2025-12-05T05:49:24+5:302025-12-05T05:50:13+5:30
Teacher Strike Maharashtra: विरोधी आणि सत्ताधारी पक्षांतील शिक्षक आमदारांनीही या बंदला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे प्रशासन आणि शिक्षक संघटना आमने-सामने उभे ठाकल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

राज्यातील ८० हजार शाळा आज बंद; शिक्षकांचा एल्गार, वेतन कपातीच्या आदेशानंतरही शिक्षक संघटना ‘बंद’वर ठाम
मुंबई : सन २०२४ चे संच मान्यता धोरण रद्द करण्याची मागणी आणि टीईटी परीक्षेमुळे वाढलेला संभ्रम याकडे लक्ष वेधण्यासाठी राज्यातील सर्व सरकारी आणि खासगी अनुदानित ८० हजार शाळा आज, शुक्रवारी बंद ठेवण्याचे आवाहन शिक्षक संघटनांनी केले आहे.
विरोधी आणि सत्ताधारी पक्षांतील शिक्षक आमदारांनीही या बंदला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे प्रशासन आणि शिक्षक संघटना आमने-सामने उभे ठाकल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
बंदमध्ये सामील होणाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन कपात करण्याचा आदेश माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी दिल्यानंतरही शिक्षकांचा आंदोलनाचा निर्धार आहे.
संघटनांचे म्हणणे काय?
राज्यात ठिकठिकाणी शिक्षण विभागाच्या कार्यालयात शिक्षक निवेदन देणार आहेत, असे शिक्षक सेनेचे कार्याध्यक्ष जालिंदर सरोदे यांनी सांगितले. तर संच मान्यता निकषांनुसार राज्यातील हजारो शाळांमध्ये केवळ एक किंवा दोनच शिक्षक नियुक्त होतील. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होईल, असा दावा प्राथमिक शिक्षक संघाचे संभाजीराव थोरात यांनी केला.
आता वर्षातून दोनदा टीईटी परीक्षा घेण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. संचमान्यता प्रक्रियेवर शासनाने तात्पुरती स्थगितीही दिली आहे. या विषयावर शिक्षकांकडून विधायक सूचना आल्यास शासन निश्चितपणे त्यावर विचार करेल. -दादा भुसे, शिक्षण मंत्री