'हे सरकार फक्त श्रीमंतांचे', महाराष्ट्रातील ७६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्येवरुन राहुल गांधींचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2025 12:29 IST2025-07-03T12:29:13+5:302025-07-03T12:29:24+5:30
जानेवारी ते मार्च या कालावधीत राज्यात एकूण ७६७ हून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.

'हे सरकार फक्त श्रीमंतांचे', महाराष्ट्रातील ७६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्येवरुन राहुल गांधींचा हल्लाबोल
Rahul Gandhi on Farmer Suicide: शेतकऱ्यांच्या आत्महत्या, हा महाराष्ट्राला लागलेला शाप आहे. दरवर्षी अनेक शेतकरी नापिकी, दुष्काळ आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या करतात. आता याच मुद्द्यावरुन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. 'सरकार शेतकऱ्यांचा नाही, तर श्रीमंतांचा विचार करते. मोदींनी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार म्हटले होते, परंतु आज शेतकऱ्यांचे आयुष्य अर्धे होत चालले आहे,' अशी टीका राहुल यांनी केली.
काही दिवसांपूर्वी समोर आलेल्या माहितीनुसार, जानेवारी ते मार्च या कालावधीत राज्यात एकूण ७०० हून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. आत्महत्या करणाऱ्या बहुतांश घटना विदर्भातील आहेत. शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्यांबद्दल काँग्रेस आमदारांनी महाराष्ट्र सरकारला जाबही विचारला. काँग्रेस आमदारांनी सरकारने दिलेली १ लाख रुपयांची रक्कम वाढवण्याची मागणी केली आहे.
३ महिन्यांत ७०० हून अधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या
राहुल गांधींनी सोशल मीडिया पोस्टद्वारे सरकारवर निशाणा साधताना म्हटले की, 'अवघ्या तीन महिन्यांत ७६७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. हे फक्त आकडे नाहीत, तर ७६७ शेतकऱ्यांची उद्ध्वस्त घरे आहेत. ही अशी कुटुंबे आहेत, जी कधीही सावरू शकणार नाहीत. सरकार या प्रकरणात पूर्णपणे गप्प आहे. ते फक्त उदासीनतेने पाहत आहे.'
सरकारचे फक्त श्रीमंतांवर लक्ष
'शेतकरी दररोज कर्जात बुडत आहेत. बियाणे महाग आहेत, खते महाग आहेत, डिझेल महाग आहे. पण एमएसपीची कोणतीही हमी नाही. जेव्हा शेतकरी कर्जमाफीची मागणी करतात, तेव्हा त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले जाते. पण मोदी सरकार श्रीमंतांचे करोडो रुपयांचे कर्ज सहजपणे माफ करते.' याचे उदाहरण देत त्यांनी अनिल अंबानींच्या ४८,००० कोटी रुपयांच्या एसबीआय फसवणुकीचा उल्लेख केला.
सरकार शेतकऱ्यांना मारत आहे
राहुल गांधी यांनी केंद्र सरकारने दिलेल्या आश्वासनांची आठवण करुन देत म्हटले की, 'मोदीजी म्हणाले होते की, ते शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करतील. शेतकरी आत्महत्यांच्या घटनांकडे पाहता, असा अंदाज लावता येतो की, उत्पन्न दुप्पट झाले नाही, तर शेतकऱ्यांचे आयुष्य निम्मे होत चालले आहे. ही व्यवस्था शेतकऱ्यांना शांतपणे आणि सतत मारत आहे. मोदीजी फक्त त्यांच्याच तमाशा पाहत आहेत,' अशी घणाघाती टीकाही राहुल यांनी केली.