"राष्ट्रवादीत फूट पाडण्यासाठी ५ कोटींचं पॅकेज अन्..."; आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2026 15:23 IST2026-03-31T15:20:08+5:302026-03-31T15:23:24+5:30
उगाच आमच्या पक्षात लुडबूड करू नका. यापुढे जर आमच्या पक्षावर टीका टीप्पणी केली तर जशास तसं उत्तर आमच्याकडून दिले जाईल असा इशाराही राष्ट्रवादीचे नेते सूरज चव्हाण यांनी दिला.

"राष्ट्रवादीत फूट पाडण्यासाठी ५ कोटींचं पॅकेज अन्..."; आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप
मुंबई - राष्ट्रवादीच्या दोन्ही गटातील संघर्ष टोकाला पोहचला आहे. रोहित पवारांनी राष्ट्रवादी पक्ष ताब्यात घेण्यासाठी ५ कोटींचे पॅकेज दिल्याचा गंभीर आरोप अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते सूरज चव्हाण यांनी केला आहे. रोहित पवार आमच्या पक्षात फूट पाडण्यासाठी आमच्या नेत्यांना बदनाम करण्यासाठी एका एजन्सीला ५ कोटी दिल्याचे सूरज चव्हाणांनी म्हटलं.
सूरज चव्हाण यांनी दावा केला की, रोहित पवार यांनी पक्षातील कार्यकर्त्यांना खोटा आरोप करण्यासाठी, आमच्या नेत्यांवर टीका करण्यासाठी काही नेमणुका केल्या आहेत. ते पदाधिकारी सातत्याने आमच्या पक्षाला बदनाम करण्याचं काम करतात. आमच्या पक्षात फूट कशी पडेल, भांडणे कशी लागतील याचा प्रयत्न केला जात आहे. त्यांच्या एका प्रवक्त्यांनी पक्षाच्या संविधानातून काही माहिती वगळल्याची अर्धवट माहिती दिली. परंतु आमच्या पक्षात सेवा दल, ओबीसी सेल हे कधीही फ्रन्टलमध्ये नव्हते. ते सेल म्हणून पक्षात कार्यरत होते असं त्यांनी सांगितले.
तसेच जाणीवपूर्वक आमचा पक्ष अडचणीत आणून पक्षाची बदनामी कशी होईल यासाठी रोहित पवारांच्या टीमकडून काम केले जात आहे. जेवढं तुम्ही आमच्या पक्षावर लक्ष देता, तेवढे तुम्ही तुमच्या आमदार, खासदारांवर द्या. मोहोळचे आमदार कोणत्या पक्षाचा बॅनर लावून कार्यक्रम घेतात ते पाहा. आमच्या पक्षाला शिस्त लावण्यासाठी सुनेत्रा पवार सक्षम आहेत. उगाच आमच्या पक्षात लुडबूड करू नका. यापुढे जर आमच्या पक्षावर टीका टीप्पणी केली तर जशास तसं उत्तर आमच्याकडून दिले जाईल असा इशाराही राष्ट्रवादीचे नेते सूरज चव्हाण यांनी दिला.
काय केला होता रोहित पवारांनी दावा?
शरद पवार गटाचे नेते आमदार रोहित पवार यांनी एक खळबळजनक दावा केला होता. अजित पवार यांच्या निधनानंतर सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी पक्षावर कब्जा करण्याचा प्रयत्न केला होता. सुनित्रा काकींना मला एवढेच सांगायचे की राजकारण खूप वंगाळ झालं आहे. अवतीभवतीचे जे लोक आहेत त्यांच्याबद्दल आपल्याला काळजी घ्यावी लागेल. अजित पवार यांच्या अपघाताविषयी एक-दोन आमदार सोडले तर कुठलाही आमदार बोलला नाही. कारण अजितदादांच्या विमान अपघाताविषयी सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांनीच सांगितलं होतं की अजिबात बोलायचं नाही असा आरोप रोहित पवारांनी केला. या सगळ्या गोष्टींकडे पाहिलं तर असं वाटतं की कुठेतरी हा कट आधीच रचला गेला होता का? तसेच पक्षावर नियंत्रण मिळवण्यासाठी काही लोकांचा हेतू आहे का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता.