गणेशोत्सवासाठी कोकणात २२०० बसेस सोडणार, परिवहन मंत्री अनिल परब यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2021 07:54 IST2021-07-15T07:53:28+5:302021-07-15T07:54:44+5:30

गणेशोत्सवासाठी जादा बसेस सोडण्याचा एसटी महामंडळाचा निर्णय. १६ जुलैपासून आरक्षण करता येणार.

2200 st buses to leave for Konkan Ganeshotsav said minister anil parab | गणेशोत्सवासाठी कोकणात २२०० बसेस सोडणार, परिवहन मंत्री अनिल परब यांची माहिती

गणेशोत्सवासाठी कोकणात २२०० बसेस सोडणार, परिवहन मंत्री अनिल परब यांची माहिती

ठळक मुद्देगणेशोत्सवासाठी जादा बसेस सोडण्याचा एसटी महामंडळाचा निर्णय.१६ जुलैपासून आरक्षण करता येणार.

गणपती उत्सवासाठी एसटी महामंडळाने यंदा २२०० जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली आहे. मुंबई, ठाणे आणि पालघर येथील प्रमुख बसस्थानकातून ४ सप्टेंबरपासून या बसगाड्या सुरू होतील. १६ जुलैपासून या गणेशोत्सव विशेष गाड्यांचे आरक्षण करता येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

दरवर्षी गणपती उत्‍सवासाठी कोकणात विशेष एसटी गाड्या सोडल्या जातात. गेल्यावर्षी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्य शासनाने वाहतुकीवर निर्बंध घातले होते; मात्र यंदा कोरोनाचे सर्व नियम पाळत गणेशोत्सवासाठी जादा गाड्या उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यानुसार सुमारे २२०० जादा गाड्या कोकणातील रस्त्यावर धावतील, असे परब यांनी सांगितले. गणेशोत्सवासाठी ४ सप्टेंबर ते १० सप्टेंबर २०२१ दरम्यान या गाड्यांचा प्रवास सुरू राहील. तर १४ सप्टेंबर ते २० सप्टेंबर दरम्यान या गाड्या कोकणातून परतीच्या प्रवासाला लागतील. या बसेससाठी १६ जुलै २०२१ पासून आरक्षणाला सुरुवात होणार असून, परतीच्या प्रवासाचेदेखील म्हणजेच एकाचवेळी आरक्षण करता येणार आहे. प्रवासापूर्वी सर्व बसेस निर्जंतूक केल्या जाणार असून, प्रवासादरम्यान सर्व प्रवाशांना मास्क घालून प्रवास करणे बंधनकारक करण्यात येणार आहे.

गणेशोत्सवादरम्यान एसटीची वाहतूक सुरळीत होण्यासाठी बसस्थानक व बसथांब्यावर एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली कर्मचारी अहोरात्र कार्यरत राहणार आहेत, तसेच कोकणातील महामार्गावर ठिकठिकाणी वाहनदुरुस्ती पथकदेखील तैनात करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर प्रवाशांना नैसर्गिक विधीसाठी तात्पुरत्या स्वरूपाचे प्रसाधनगृह उभारण्यात येणार आहेत, असेही परब यांनी सांगितले.

Web Title: 2200 st buses to leave for Konkan Ganeshotsav said minister anil parab