पहाटे ५ वाजता शिंदेसेनेच्या आमदाराच्या घरी १०० पोलिसांची धाड; घराची झाडाझडती, भाजपावर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2025 06:28 IST2025-11-28T06:28:01+5:302025-11-28T06:28:42+5:30
ही झडती कोणाच्या सांगण्यावरून घेतली? शिंदेसेनेचे आमदार हेमंत पाटील यांचा सवाल

पहाटे ५ वाजता शिंदेसेनेच्या आमदाराच्या घरी १०० पोलिसांची धाड; घराची झाडाझडती, भाजपावर आरोप
हिंगोली - आ. संतोष बांगर यांनी शिवसेना फुटली तेव्हा एकनाथ शिंदे यांच्याकडून ५० कोटी रुपये घेतले होते. हे स्वतः त्यांनीच सांगितले होते, असा आरोप भाजपा आ. तान्हाजी मुटकुळे यांनी केला.
मुटकुळे म्हणाले की, शिवसेना फुटली तेव्हा पहिल्या दिवशी बांगर म्हणाले होते, उद्धव ठाकरे देवमाणूस आहेत अन् दुसऱ्याच दिवशी ते शिंदेसेनेत गेले असं त्यांनी सांगितले तर आ. मुटकुळे साडेतीन वर्ष गप्प का होते, असा सवाल करत शिंदेसेनेचे आमदार हेमंत पाटील यांनी बांगर यांनी पैसे घेतलेले नाहीत, असा दावा केला. बांगर यांच्या घरावर पहाटे पाच वाजता १०० पोलिसांनी छापा टाकून झाडाझडती घेतली. ही झडती कोणाच्या सांगण्यावरून घेतली? असा सवालही पाटील यांनी केला.
कणकवलीतही युतीत वितुष्ट
मालवण येथे भाजपाचे जिल्हा चिटणीस विजय केनवडेकर यांच्या घरी आढळलेल्या पैशांच्या बॅगवरून भाजपचे आमदार तथा पालकमंत्री नितेश राणे आणि शिंदेसेनेचे आमदार नीलेश राणे हे बंधू एकमेकांच्याविरोधात उभे ठाकल्याचे चित्र गुरुवारी दिसून आले. आमचे स्वतःचे व्यवसाय असतात. स्वतःच्या व्यवसायासाठी घरात पैसे ठेवले असतील तर त्यात चूक काय? राजकीय चष्म्यातून प्रत्येक गोष्टीकडे पाहू नये, आमच्या पक्षाची कोणीही बदनामी करू नये, असा इशारा नितेश राणे यांनी दिला.
भाजप पदाधिकाऱ्याच्या घरात सापडलेल्या रकमेबाबत अद्यापही एफआयआर का दाखल झाला नाही? त्याच्यावर कारवाई कधी करणार, अशी विचारणा नीलेश राणे यांनी निवडणूक अधिकारी आणि मालवण पोलिस निरीक्षक मारुती जगताप यांची भेट घेऊन केली.