शेतीत पाणीच पाणी! मराठवाड्यात सर्वाधिक अवकाळी पाऊस लातूर जिल्ह्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2025 19:47 IST2025-05-26T19:47:27+5:302025-05-26T19:47:52+5:30
आता हवामान विभागाने पुढील ५ दिवसांत आणखी मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा इशारा दिल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.

शेतीत पाणीच पाणी! मराठवाड्यात सर्वाधिक अवकाळी पाऊस लातूर जिल्ह्यात
छत्रपती संभाजीनगर : मे महिन्यात शेतकरी मशागतीत व्यस्त असताना अवकाळी पावसाने थैमान घालायला सुरुवात केली. २० दिवस झाले तरी पाऊस पिच्छा सोडायला तयार नाही. त्यात आता हवामान विभागाने पुढील ५ दिवसांत आणखी मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा इशारा दिल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. मराठवाड्यात मागील २० दिवसांत सर्वाधिक पावसाची नोंद लातूर जिल्ह्यात झाली. येथे १९३.४ मिमी पाऊस झाला. त्या खालोखाल धाराशिव जिल्ह्यात १६७.५ मिमी पाऊस झाला.
विभागीय आयुक्त कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, ६ मेपासून वादळ वाऱ्याला सुरुवात झाली. प्रारंभी रिमझिम पावसाच्या सरी आणि विजांचा कडकडाट सुरू होता. वीज कोसळून आतापर्यंत मराठवाड्यात २७ पेक्षा अधिक नागरिकांना जीव गमवावा लागला. शेतकरी मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मशागतीवर अधिक भर देतात. यंदा मराठवाड्याला मे महिन्याचे कडक ऊन जाणवलेच नाही. तापमान साधारण २९ ते ३५ अंश सेल्सिअसपर्यंत राहिले आहे. हवामान चक्र बिघडल्याचा फटका शेतकऱ्यांना चांगलाच बसला आहे.
शेतीत पाणीच पाणी
मृग नक्षत्र सुरू होण्यास अजून १३ दिवस शिल्लक आहेत. त्यापूर्वीच मान्सून सक्रिय होणार असल्याचे संकेत हवामान विभागाकडून देण्यात येत असल्याने शेतकरी आणखी हवालदिल झाले आहेत. शेतात पाणी साचलेले असल्याने मशागत कधी करणार, हा सर्वात मोठा प्रश्न आहे.
कोणत्या जिल्ह्यात किती पाऊस
जिल्हा----------------पाऊस मिमी
छत्रपती संभाजीनगर ---१२२.३
जालना------------------ १३७.९
बीड---------------------१३९.९
लातूर------------------ १९३.४
धाराशिव------------------ १६७.५
नांदेड--------------------१०४.९
परभणी------------------ ९३.८
हिंगोली------------------१०२.८