"आई-बाबा, मला माफ करा; अपेक्षा पूर्ण करू शकत नाही", लातुरात विद्यार्थिनीने मृत्यूला कवटाळलं
By राजकुमार जोंधळे | Updated: May 23, 2025 00:07 IST2025-05-23T00:02:58+5:302025-05-23T00:07:28+5:30
Latur crime news: धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूरची सृष्टी लातुरातील एका महाविद्यालयात शिकत होती. आई वडिलांची माफी मागत तिने वसतिगृहातच आयुष्याला पूर्णविराम दिला.

"आई-बाबा, मला माफ करा; अपेक्षा पूर्ण करू शकत नाही", लातुरात विद्यार्थिनीने मृत्यूला कवटाळलं
- राजकुमार जोंधळे, लातूर
‘आई-बाबा, मला माफ करा...’, अशी चिठ्ठी लिहून ठेवत लातुरात इयत्ता बारावीत शिकत असलेल्या सृष्टी सुभाष शिंदे (वय १७) या विद्यार्थिनीने वसतिगृहात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी दुपारी ४:३० वाजता घडली. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर येथील सृष्टी शिंदे ही लातुरातील दयानंद विज्ञान शाखेत इयत्ता बारावीत शिक्षण घेत होती. गुरुवारी (२२ मे) ती ४:३० वाजण्याच्या सुमारास जेवण करून वसतिगृहातील खोलीत आली.
खोलीत कुणी नसल्याचे पाहून सृष्टीने संपवले आयुष्य
ती खोलीत आली, त्यावेळी खोलीतील इतर मुली बाहेर गेल्या होत्या. त्याचवेळी सृष्टीने गळफास घेत आपले जीवन संपविले. सोबतच्या मुली थोड्या वेळाने खोलीवर आल्या. त्यांनी दार वाजवले, मात्र आतून काहीच प्रतिसाद मिळाला नाही.
मुलींनी याची माहिती वसतिगृहातील कर्मचाऱ्यांना दिली. यावेळी कर्मचाऱ्यांनी पाहिले असता सृष्टी शिंदे या विद्यार्थिनीने गळफास घेतल्याचे आढळून आले. या घटनेची माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याला देण्यात आली.
पोलीस निरीक्षक सुधाकर देडे, स.पो.नि. देवकत्ते, अंमलदार संतोष गोसावी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी लातुरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केला आहे.
अभ्यासाच्या ताणतणावातून सृष्टीने घेतला टोकाचा निर्णय...
अभ्यासाच्या ताणतणावातून सृष्टी शिंदे हिने गळफास घेत जीवन संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतल्याची प्राथमिक माहिती चिठ्ठीत नमूद केलेल्या मजकुरावरून समोर आली आहे, असे एमआयडीसी ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधाकर देडे म्हणाले.
सृष्टीने चिठ्ठीमध्ये लिहिले,आई-बाबा, मला माफ करा...
सृष्टी शिंदे हिने आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली होती. ‘आई-बाबा मला माफ करा, मी तुमच्या अपेक्षा पूर्ण करु शकत नाही,’ असा मजकूर त्यामध्ये लिहिलेला असल्याचे पोलिसांनी सांगितले.
तीन दिवसांमध्ये दोघींच्या आत्महत्या
अभ्यासाच्या ताणतणावातून लातुरात गुरुवारी विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना घडली; तर मंगळवारी शासकीय महिला तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या वसतिगृहात गायत्री विष्णुकांत इंद्राळे (१७, मंग्याळ ता. मुखेड, जि. नांदेड) या विद्यार्थिनीने ओढणीने गळफास घेतल्याची घटना घडली होती.