लातूरात महायुतीची सत्ता टिकली, पण भाजपचा गड ढासळला; काँग्रेस ठरला सर्वात मोठा पक्ष!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2026 17:58 IST2026-02-09T17:55:00+5:302026-02-09T17:58:16+5:30
गत निवडणुकीत ३५ जागांसह एकहाती वर्चस्व राखणारा भाजप यंदा १८ जागांवर येऊन फेकला गेला आहे.

लातूरात महायुतीची सत्ता टिकली, पण भाजपचा गड ढासळला; काँग्रेस ठरला सर्वात मोठा पक्ष!
लातूर: लातूर जिल्हा परिषदेच्या ५९ जागांसाठी झालेल्या निवडणुकीचा निकाल सोमवारी जाहीर झाला. अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या युद्धात भाजप-राष्ट्रवादी (अजित पवार) आणि शिंदेसेना महायुतीने सत्तेचा सोपान गाठला असला, तरी भारतीय जनता पक्षाला या निकालाने मोठा धक्का दिला आहे. भाजपने आपल्या हक्काच्या १७ जागा गमावल्या आहेत, तर दुसरीकडे काँग्रेसने मुसंडी मारत जिल्ह्यात आपले स्थान पुन्हा एकदा निर्माण केले आहे.
भाजपला मोठा हादरा, काँग्रेसची भरारी
गत निवडणुकीत ३५ जागांसह एकहाती वर्चस्व राखणारा भाजप यंदा १८ जागांवर येऊन फेकला गेला आहे. याउलट, काँग्रेसने दमदार कामगिरी करत आपल्या जागा १५ वरून २३ वर नेल्या आहेत. काँग्रेस आता जिल्हा परिषदेतील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. मात्र, महायुतीच्या एकत्रित बलाबलानुसार सत्तेच्या चाव्या पुन्हा एकदा महायुतीकडेच राहण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादी (अजित पवार) ठरली 'किंगमेकर'
या निकालात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) महत्त्वाची भूमिका बजावताना दिसत आहे. त्यांच्या १२ जागा निवडून आल्याने भाजपची सत्ता टिकवण्यासाठी हे 'बळ' अत्यंत मोलाचे ठरणार आहे. विशेष म्हणजे, मनसे आणि शिंदेसेना यांनी लातूर जिल्हा परिषदेत आपले खाते उघडून इतिहास रचला आहे. उद्धवसेना आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) यांनाही प्रत्येकी एका जागेवर समाधान मानावे लागले आहे. दोन अपक्षांनीही प्रस्थापितांना धूळ चारत विजय मिळवला आहे.
नवे पक्षीय बलाबल (एकूण ५९ जागा):
काँग्रेस: २३
भाजप: १८
राष्ट्रवादी (अजित पवार): १२
शिंदेसेना: ०१
उद्धवसेना: ०१
मनसे: ०१
राष्ट्रवादी (शरद पवार): ०१
अपक्ष: ०२