Latur: २१०० विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला पुरामुळे ब्रेक; तेरणा-मांजराच्या बॅकवॉटरमुळे पूल पाण्याखाली
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2025 15:55 IST2025-09-30T15:53:30+5:302025-09-30T15:55:03+5:30
Latur flood: पूल पाण्याखाली असल्याने २० दिवसांपासून अडचण

Latur: २१०० विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला पुरामुळे ब्रेक; तेरणा-मांजराच्या बॅकवॉटरमुळे पूल पाण्याखाली
- बालाजी थेटे
औराद शहाजानी (जि. लातूर) : अतिवृष्टीमुळे तेरणा- मांजरा नदी संगमावर पूरपरिस्थिती आहे. परिणामी, हजारो हेक्टर शेती पाण्यात आहे. शिवाय, सीमावर्ती भागातील पूल, रस्ते अद्याप पाण्याखाली आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेस ये-जा करता येत नाही. २० दिवसांपासून जवळपास २१०० विद्यार्थी शाळेपासून दुरावले आहेत.
१० सप्टेंबरपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने पूर येऊन औराद शहाजानी भागातील नदीपात्रावरील औराद- कोंगळी, औराद-हालसी तुगाव, औराद-वांजरखेडा, औराद-तगरखेडा, औराद-माने जवळगा, औराद-सायगाव, औराद-इंचूर पूल, रस्ते पाण्याखाली आहेत. तसेच तगरखेडा, हालसी, माने जवळगा, सावरी, तुगाव, वांजरखेडा, कोंगळी, अट्टरगा, श्रीमाळी, आळवाई, मेहकर, तांबरवाडी, जामखंडी आदी भागांत बॅक वॉटर पसरले आहे. परिणामी, गावांचा संपर्क तुटलेलाच आहे.
औराद शहाजानी केंद्रांतर्गत ११ गावे असून १३ जिल्हा परिषद शाळा व १९ खासगी शाळा आहेत. तसेच तीन महाविद्यालये आहेत. या शैक्षणिक संस्थांमध्ये जवळपास ६५०० विद्यार्थी आहेत. पुरामुळे ये-जा करता येत नसल्याने परिसरातील जवळपास २१०० विद्यार्थ्यांची शाळाच बंद झाली आहे.
४० टक्के विद्यार्थी अनुपस्थित
येथील शैक्षणिक संस्थांमध्ये स्थानिकचे ३० ते ४० टक्के विद्यार्थी आहेत. उर्वरित बाहेरगावहून ये-जा करतात. अतिवृष्टीमुळे पूर आल्याने रस्ते बंद आहेत. त्यामुळे शाळा, महाविद्यालयातील जवळपास ४० ते ५० टक्के विद्यार्थी तीन आठवड्यांपासून अनुपस्थित राहत असल्याचे दिसत आहे.
- एस. आय. चिल्लाळे, केंद्रप्रमुख.
पुलांची उंची वाढवावी
लातूर, बीड, धाराशिव जिल्ह्यांत पाऊस झाला की, पाणी इकडे येते. त्यामुळे या भागातील पुलांची उंची वाढवावी. रस्ते तत्काळ दुरुस्त करावेत, अशी मागणी तगरखेड्याचे उपसरपंच मदन बिरादार यांनी केली.
गुणवत्तेवर परिणाम
पावसाळ्यात दरवर्षी अशी परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर परिणाम होत आहे, असे संजय थेटे यांनी सांगितले.