भाजीपाल्याच्या दरात आणखीन घसरण; टोमॅटो ८, कोबी १० रुपये प्रतिकिलो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:46 IST2020-12-11T04:46:06+5:302020-12-11T04:46:06+5:30

उदगीर : येथील बाजारपेठेत भाज्यांची आवक मोठ्या प्रमाणावर होत असल्याने गेल्या महिन्याच्या तुलनेत दर निम्म्यावर आले आहेत. टोमॅटोचे दर ...

Further fall in vegetable prices; Tomatoes 8, cabbage Rs 10 per kg | भाजीपाल्याच्या दरात आणखीन घसरण; टोमॅटो ८, कोबी १० रुपये प्रतिकिलो

भाजीपाल्याच्या दरात आणखीन घसरण; टोमॅटो ८, कोबी १० रुपये प्रतिकिलो

उदगीर : येथील बाजारपेठेत भाज्यांची आवक मोठ्या प्रमाणावर होत असल्याने गेल्या महिन्याच्या तुलनेत दर निम्म्यावर आले आहेत. टोमॅटोचे दर तर प्रचंड गडगडले असून, केवळ ८ रुपये किलोपर्यंत भाव मिळत आहे. महाग असलेला हिरवा वाटाणाही ४० रुपये किलो रुपयांपर्यंत उतरला आहे. त्यामुळे शेतकरी पुन्हा संकटात सापडले आहेत.

तालुक्यात परतीच्या जोरदार पावसामुळे खरिपाच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले; परंतु या पावसाने विहिरी, नाले, तलावांत बऱ्यापैकी पाण्याचा साठा झाला आहे. त्यामुळे तालुक्यातील कुमठा, लोहारा, माळेवाडी, नागलगाव, मोघा, बनशेळकीसह अन्य गावांतील शेतकऱ्यांनी भाजीपाल्याची लागवड केली. दोन आठवड्यांपासून भाज्यांची आवक मोठ्या प्रमाणावर सुरू झाली आहे. सध्या टोमॅटोची व कोबीची आवक मोठ्या प्रमाणावर झाली असून, चांगल्या प्रतीचे टोमॅटो पाच रुपयांपासून आठ रुपयांपर्यंत मिळत आहेत, तर कोबी १० रुपये प्रतिकिलो दराने विक्री करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. मध्यंतरी भाजीपाल्याचे दर वाढले होते; पण आवक कमी होती. त्यामुळे काही प्रमाणात मागणी वाढली.

सध्या कोथिंबिरीची जुडीही पाच रुपयांना झाली आहे. इतर भाज्यांचे दर गेल्या आठवड्यापेक्षा सध्या निम्म्यावर आले आहेत. मेथीच्या दोन जुड्या १० रुपयांना, तर पालकसुद्धा त्याच दराने विक्री होत आहे.

३० रुपये किलो दराने मिळणारी वांगी १५ रुपयांवर, तर ४० रुपये किलो असणारी सिमला मिरची २० रुपये किलो झाली आहे. मिरचीचीही आवक मोठ्या प्रमाणात झाल्याने ३५ रुपयांवरून दर निम्मे होत १२ ते १५ रुपयांपर्यंत झाले आहेत. हिरव्या वाटाण्याचा दर मागील आठवड्यात ८० ते १०० रुपये असा होता. या आठवड्यात भाव उतरून ४० रुपये किलोवर आले आहेत. कोबीचाही दर निम्म्यावर आला असून, ती १० रुपये किलोने मिळत आहे. कांदा व बटाट्याचा दर मात्र थोडासा वधारला आहे. चांगल्या प्रतीचा कांदा २५ ते ४० रुपयांपर्यंत मिळत आहे, तर बटाटे ४० रुपये किलो दराने विकले जात आहेत.

भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणावर होत असल्याने दर घसरले आहेत. दररोज आवक चांगली होत असून, त्या तुलनेत मागणी नसल्याने दरात वाढ होण्याची शक्यता नाही.

भाजीपाला विक्रेते शेख फैयाज म्हणाले, मागील महिन्यापेक्षा सध्या तालुक्याच्या काही भागांतून आवक वाढल्याने दर कमी झाले आहेत. एवढे दर कमी होऊनसुद्धा ग्राहक खरेदीसाठी धजावत नाहीत. अशावेळी शेतकऱ्यांच्या शेतमालाला चांगला दर कसा मिळेल? त्यामुळे शेतकऱ्यांना लागवडीचा खर्चही निघेनासा झाला आहे.

Web Title: Further fall in vegetable prices; Tomatoes 8, cabbage Rs 10 per kg