विद्युत तारांचा स्पर्श अन् कडब्याचा भडका; क्षणात ७०० पेंड्यांसह ट्रॅक्टर भस्मसात, चालक बचावला
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2026 19:43 IST2026-04-25T19:41:36+5:302026-04-25T19:43:15+5:30
चालकाने प्रसंगावधान दाखवल्यामुळे मोठा अनर्थ टळला असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही

विद्युत तारांचा स्पर्श अन् कडब्याचा भडका; क्षणात ७०० पेंड्यांसह ट्रॅक्टर भस्मसात, चालक बचावला
कमलनगर (जि. बीदर): तालुक्यातील हांदिखेर येथे शनिवारी दुपारी एका ट्रॅक्टरला भीषण आग लागून कडब्यासह संपूर्ण ट्रॅक्टर जळून भस्मसात झाला. रस्त्यावरील लोंबकळणाऱ्या विद्युत तारांचा स्पर्श कडब्याला झाल्याने ही दुर्घटना घडली. सुदैवाने, चालकाने प्रसंगावधान दाखवल्यामुळे मोठा अनर्थ टळला असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
क्षणार्धात झाले राखरांगोळी
हांदिखेर तांडा येथील शेतकरी नामदेव जाधव यांनी चिमेगावहून ७०० कडब्याच्या पेंड्या खरेदी केल्या होत्या. ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये कडब्याची उंच गंजी रचून ते गावाकडे येत असताना, गावच्या चौकात लोंबकळणाऱ्या वीज तारांचा स्पर्श कडब्याला झाला. उन्हाचा कडाका आणि वाऱ्यामुळे आगीने क्षणार्धात रौद्ररूप धारण केले. आग लागल्याचे लक्षात येताच चालकाने ट्रॅक्टर वेगाने गावाबाहेर नेला, मात्र तोपर्यंत आगीने ट्रॅक्टरचे इंजिन आणि ट्रॉलीला पूर्णपणे कवेत घेतले होते.
विद्युत तारांच्या स्पर्शाने ७०० कडब्याच्या पेंड्या अन् ट्रॅक्टरचे इंजिन जळाले! गावच्या चौकात घडलेल्या भीषण आगीतून चालक सुदैवाने बचावला. #latur#marathwada#Bidarpic.twitter.com/WjdAn8d9I2
— Lokmat Chhatrapati Sambhajinagar (@milokmatabd) April 25, 2026
शेतकऱ्याचे मोठे नुकसान
या आगीत ७०० कडब्याच्या पेंड्या, ट्रॉली आणि ट्रॅक्टरचे हेड (इंजिन) पूर्णपणे जळून खाक झाले आहे. लोंबकळणाऱ्या विद्युत तारांकडे संबंधित विभागाने दुर्लक्ष केल्यामुळेच ही घटना घडल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. या आगीमुळे शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून प्रशासनाकडून पंचनाम्याची मागणी केली जात आहे.