शेतीच्या वादातून दुहेरी हत्याकांड; तिघांना जन्मठेप, उदगीर जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
By हरी मोकाशे | Updated: May 8, 2026 21:39 IST2026-05-08T21:39:04+5:302026-05-08T21:39:22+5:30
यातील दोन महिला आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

शेतीच्या वादातून दुहेरी हत्याकांड; तिघांना जन्मठेप, उदगीर जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
हरी मोकाशे, उदगीर (जि. लातूर) : शेतीच्या वादातून चुलते व मेव्हण्याची हत्या करणाऱ्या तीन आरोपींना उदगीर जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश डी. बी. म्हालटकर यांनी जन्मठेपेची शिक्षा शुक्रवारी सुनावली आहे. यातील दोन महिला आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
उदगीर तालुक्यातील हेर येथे शेतीच्या वादातून ११ फेबुवारी २०२१ रोजी बालाजी जगताप, अंकुश जगताप, लहू जगताप, फुलाबाई जगताप व पूजा जगताप यांनी संगनमत करून गोविंद जगताप व नितीन फावडे या दोघांचा खून केला होता. तसेच भगवान जगताप यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात जनाबाई बिरादार यांच्या तक्रारीवरून वरील आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा तपास तत्कालिन पोलीस निरीक्षक दीपककुमार वाघमारे यांनी करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सुनावणीदरम्यान सरकार पक्षातर्फे २१ साक्षीदार व बचाव पक्षातर्फे ६ साक्षीदार तपासण्यात आले. तपासाअंती शुक्रवारी सरकारी वकील ॲड. शिवकुमार गिरवलकर यांचा युक्तिवाद, साक्षीदारांच्या साक्षी, वैद्यकीय अधिकाऱ्यांचा पुरावा व कागदपत्रे ग्राह्य धरून न्यायाधीश म्हालटकर यांनी निकाल दिला.
यात बालाजी जगताप, अंकुश जगताप, लहू जगताप (तिघेही, रा. हेर, ता. उदगीर) यांना कलम ३०२ नुसार जन्मठेप, कलम ३०७ प्रमाणे १० वर्षे सश्रम व कलम ३२४ नुसार १ महिना सश्रम कारावास तसेच ६ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. तसेच यातील महिला आरोपी फुलाबाई जगताप व पूजा जगताप यांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली. सरकार पक्षातर्फे ॲड. शिवकुमार गिरवलकर यांनी काम पाहिले. त्यांना ॲड. आर.पी. गंभीरे व कोर्ट पैरवी अधिकारी पोहेकॉ. अक्रम शेख यांनी सहकार्य केले.