१२ हजार मिळकतींचा घरफाळा शून्य, मोठे आर्थिक नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:22 IST2021-01-21T04:22:08+5:302021-01-21T04:22:08+5:30

कोल्हापूर : महानगरपालिकेचे तत्कालीन करनिर्धारक व संग्राहक संजय भोसले यांच्या कारकीर्दीत सन २०११ व २०१२ पासून शहरातील १० ...

Zero house tax of 12 thousand properties, huge financial loss | १२ हजार मिळकतींचा घरफाळा शून्य, मोठे आर्थिक नुकसान

१२ हजार मिळकतींचा घरफाळा शून्य, मोठे आर्थिक नुकसान

कोल्हापूर : महानगरपालिकेचे तत्कालीन करनिर्धारक व संग्राहक संजय भोसले यांच्या कारकीर्दीत सन २०११ व २०१२ पासून शहरातील १० ते १२ हजार मिळकतींना त्यांच्या असेसमेंट फॉर्मवर शून्य घरफाळा आकारणी करून महानगरपालिकेचे कोट्यवधी रुपयांचे घरफाळ्याचे आर्थिक नुकसान केलेले आहे. त्यांच्यावर त्वरित फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांना निलंबित करावे, अशी मागणी माजी नगरसेवक भूपाल शेटे यांनी प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्याकडे केली आहे.

भोसले प्रभारी करनिर्धारक असताना त्यांचे बगलबच्चे असेसमेंट क्लार्क, साहाय्यक अधीक्षक, अधीक्षक या सर्वांनी मिळून शहरातील १० ते १२ हजार मिळकतींच्या असेसमेंटमध्ये मोठ्या क्षेत्राची नोंद न करता शून्य क्षेत्राची आकारणी करून असेसमेंट केलेले आहे. याबाबतचे पुरावे मी यापूर्वी तत्कालीन आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी व त्यांनी नेमलेल्या घरफाळा चौकशी समितीचे प्रमुख नितीन देसाई, अतिरिक्त आयुक्त, मुख्य लेखापाल धनंजय आंधळे, मुख्य लेखापरीक्षक संजय सरनाईक यांच्याकडे दाखल केले होते; पण या घरफाळा चौकशी समितीने संजय भोसले व त्यांच्या बगलबच्च्यांना वाचविण्यासाठी प्रयत्न केले व महापालिकेच्या कोट्यवधी रुपयांच्या घरफाळ्याच्या नुकसानीकडे दुर्लक्ष केले, असा आरोप शेटे यांनी केला.

संगणक विभागाचे सिस्टीम मॅनेजर यशपाल रजपूत यांच्याकडे वेळोवेळी लेखी तक्रारी दिल्या; पण रजपूत यांनी भोसले यांच्या दबावाखाली संपूर्ण माहिती लपवली. याबाबत आपण त्यांच्यावरही निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी करताच आयुक्तांनी त्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस दिली आहे; पण त्यांच्यावर अद्याप काहीच कारवाई झालेली नाही. ज्यांनी भ्रष्टाचार केला आणि जे कर्मचारी दोषी आहेत त्यांच्यावरही कारवाई करावी, अशी मागणी शेटे यांनी केली आहे. रजपूत यांच्याकडील सिस्टीम मॅनेजरपदाचा कार्यभार काढून घ्यावा, या संपूर्ण प्रकरणाचे ऑडिट करून घ्यावे, अशी सूचनाही त्यांनी केली.

असेसमेंट फॉर्मच गायब

हा कोट्यवधी रुपयांचा घोटाळा करताना भोसले व त्यांच्या सहकारी कर्मचाऱ्यांनी चारीही विभागीय कार्यालयांतील हजारो असेसमेंट फॉर्म गायब केलेले आहेत, फाडून टाकलेले आहेत, असा आरोपही त्यांनी केला आहे.

Web Title: Zero house tax of 12 thousand properties, huge financial loss