कोल्हापूर : राज्यात ज्या-ज्या ठिकाणी अनधिकृत उत्खनन केले असेल त्यांच्यावर कारवाई केली जाईल, तसेच दगडखाण आणि वाळू खाणचे ड्रोन सर्वेक्षण करणार आहे. हा ड्रोन जीपीएसद्वारे खाणींना जोडला जाणार आहे. आतापर्यंत खाणीत उत्खनन किती झाले, राॅयल्टी किती भरली याची चौकशी लावणार आहे. पुण्यात ड्रोन सर्वेक्षण सुरू केले तसेच कोल्हापूरसह राज्यात सुरू करणार आहे. ज्यांनी राॅयल्टी चुकवली असेल त्यांच्याकडून ती वसूल करू, ज्यांनी भरली नाही त्यांची मालमत्ता जप्त करू, अशी घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी विधानपरिषदेत केली.दगड खाणीत उत्खनन करणारा हेलिकॉप्टर घेत असेल तर शासनाला रॉयल्टीपोटी किती कोटी रुपये मिळाले, अशी विचारणा आमदार सतेज पाटील यांनी केली. त्याला महसूलमंत्र्यांनी उत्तर दिले. हातकणंगले तालुक्यातील टोप आणि कासारवाडीच्या हद्दीत डोंगररांगांत मोठ्या प्रमाणात अनधिकृत उत्खनन केले जात आहे. महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना हे उत्खनन नजरेस पडत नाही. महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी डोळ्यांवर पट्टी बांधली आहे का, अशी विचारणा करून आमदार पाटील यांनी केली.
हातकणंगले तहसीलदारांच्या अहवालात ४ लाख ब्रास उत्खनन केल्याचा उल्लेख आहे परंतु प्रत्यक्षात दबावाखाली ९६ हजार ब्रासच उत्खनन दाखविले आहे. ज्यांनी दगड खाणीत उत्खनन केले त्यांनी मधल्या काळात हेलिकाॅप्टर घेतले आहे. दगड खाणीत उत्खनन करणारा हेलिकाॅप्टर घेत असेल तर शासनाला किती रॉयल्टी मिळाली पाहिजे, असा सवाल आमदार पाटील यांनी केला.
अनधिकृत उत्खननाचे मोठे रॅकेट आहे. या रॅकेटचा पर्दाफाश करण्यासाठी जुनी राॅयल्टी वसुली झाली आहे का याची माहिती घेऊन मगच नवीन उत्खननाला परवानगी दिली पाहिजे. ४ लाख ब्रास उत्खननाच्या नोटिसा काढून २ वर्षे झाली तरी पैसे भरत नसतील आणि दुसऱ्या बाजूला हेच लोक हेलिकाॅप्टर खरेदी करत असतील तर महसूल विभाग नेमका काय करतो, अशी विचारणा त्यांनी केली.
रोज हजारो ब्रास उत्खनन..टोप कासारवाडी हद्दीत अनाधिकृत दगड उत्खनन मोठ्या प्रमाणात सुरू आहे. रोज हजारो ब्रास दगड उत्खनन केले जाते, त्यासाठी मोठ्या प्रमाणात ब्लास्टिंग केले जाते. शेकडो डंपर दगड उचलतात. शेकडो, जेसीबी आणि पोकलँड उत्खननाचे काम करतात. शासनाचा कर तर भरतच नाहीत. पण उत्खनन मात्र जोरदार सुरू आहे. त्या परिसरातील धुळीचा लोकांना प्रचंड त्रास होतो. खोलवर खाणी तयार झाल्या आहेत. महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना हे उत्खनन दिसत नाही का.. त्यांनी डोळ्यांवर पट्टी बांधली आहे का, असे प्रश्न आमदार पाटील यांनी उपस्थित केले.