Kolhapur News: 'टीईटी'मध्ये पास करण्याची हमी अन् सह्या केलेले धनादेश; रॅकेटची मोठी व्याप्ती
By उद्धव गोडसे | Updated: November 24, 2025 15:36 IST2025-11-24T15:34:32+5:302025-11-24T15:36:02+5:30
प्रश्नपत्रिकेसाठी तीन लाखांचा दर; लॉज, फार्महाऊसमध्ये राहण्याची व्यवस्था

Kolhapur News: 'टीईटी'मध्ये पास करण्याची हमी अन् सह्या केलेले धनादेश; रॅकेटची मोठी व्याप्ती
उद्धव गोडसे
कोल्हापूर : शिक्षक पात्रता परीक्षेत (टीईटी) प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देऊन हमखास पास करण्याची हमी देणारा महेश भगवान गायकवाड (रा. कराड, जि. सातारा) हा परीक्षार्थींकडून तीन लाख रुपये घेत होता. व्यवहार ठरल्यानंतर तो कोरा धनादेश आणि परीक्षार्थींची मूळ शैक्षणिक कागदपत्रे स्वत:कडे घेत होता. निकाल जाहीर होताच तो मूळ कागदपत्र परत करीत होता. अटकेतील टोळीने यापूर्वीही पेपर फोडून लाखोंची कमाई केल्याची केल्याची माहिती समोर येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पेपरफुटी प्रकरणाचा प्रमुख सूत्रधार महेश गायकवाड हा कराड तालुक्यात एक शैक्षणिक अकॅडमी चालवतो. काही काळ त्याने एका शाळेत शिक्षक म्हणून काम केले होते. गेल्या चार-पाच वर्षांपासून तो हे रॅकेट चालवित असल्याची चर्चा आहे. टेट पास करून देण्यासाठी तो तीन लाख रुपये घेत होता. परीक्षेच्या आदल्या रात्री तो परीक्षार्थींना पेपर उपलब्ध करून द्यायचा.
पेपरची झेरॉक्स कॉपी देण्याऐवजी तो प्रश्न सांगत होता. त्याचे काही सहकारी एका रात्रीत परीक्षार्थींची तयारी करून घेत होते. तत्पूर्वीच संबंधित परीक्षार्थींची मूळ कागदपत्रे आणि कोरा धनादेश घेतला जात होता. जे परीक्षार्थी नापास होतील त्यांना धनादेश आणि कागदपत्रे परत केली जायची. त्यामुळे त्याच्यावर परीक्षार्थींचा विश्वास बसला होता.
लॉज, फार्महाऊसमध्ये राहण्याची व्यवस्था
पोलिसांच्या हाती पाच परीक्षार्थी लागले असले तरी प्रत्यक्षात ३० ते ४० पेक्षा जास्त परीक्षार्थींकडून त्यांनी धनादेश घेऊन ठेवले होते. जिल्ह्यात ठिकठिकाणी काही लॉज आणि फार्महाऊसमध्ये त्यांची थांबवण्याची व्यवस्था केली होती. त्यांनी प्रत्यक्ष पैसे देऊन ठेवलेले नाहीत. तसेच परीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिका त्यांना मिळालेली नाही. त्यामुळे पोलिसांनी त्यांना आरोपी केले नाही.
अखेर पेपर आलाच नाही
शनिवारी सायंकाळपासूनच पेपरची प्रतीक्षा सुरू होती. परीक्षार्थी आणि टोळीतील आरोपी एकमेकांच्या संपर्कात होते. पोलिस मागावर असल्याची त्यांना कल्पनाच नव्हती. त्यामुळे अखेरपर्यंत त्यांची एकमेकांना फोनाफोनी सुरू होती. पहाटे पाचपर्यंत वाट पाहूनही अखेर पेपर न मिळाल्याने परीक्षार्थींनी राहुल पाटील आणि महेश गायकवाड यांच्याबद्दल राग व्यक्त केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पेपर बाहेर काढणारे कोण?
टेट परीक्षेत कोणताही गोंधळ होऊ नये यासाठी गेल्या काही दिवसांपासून शिक्षण विभागापासून प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकारी, शिक्षणाधिकारी काटेकोर नियोजन करीत होते. तरीही पेपरफुटीच्या प्रयत्नाचा प्रकार समोर आलाच. या टोळीने असा प्रयत्न पहिल्यांदाच केलेला नाही. त्यामुळे यांना पेपर उपलब्ध करून देणारे कोण आहेत? याचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर निर्माण झाले आहे.