मराठा आरक्षणासाठी निजामाचे गॅझेट का?, शाहू छत्रपती यांचा सवाल; कोल्हापूर गॅझेट लागू करण्यासाठी आंदोलनाचे रंणशिंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 12:05 IST2025-10-03T12:04:37+5:302025-10-03T12:05:02+5:30
मराठा समाजाला नेमके काय मिळाले?

मराठा आरक्षणासाठी निजामाचे गॅझेट का?, शाहू छत्रपती यांचा सवाल; कोल्हापूर गॅझेट लागू करण्यासाठी आंदोलनाचे रंणशिंग
कोल्हापूर : मराठा आरक्षणाच्या प्रश्नात राजर्षी शाहू महाराजांनी १९०२ मध्ये काढलेल्या आरक्षण आदेशाचा उल्लेख कुठेही नाही हे दुर्दैव आहे. ज्या निजामाला आपण तीनवेळा हरवले आहे. त्याचे हैद्राबाद गॅझेट आपण का स्वीकारतोय ? असा प्रश्न खासदार शाहू छत्रपती यांनी बुधवारी उपस्थित केला. ऐतिहासिक भवानी मंडपात मराठा आरक्षणासाठीकोल्हापूर गॅझेट लागू करण्याच्या आंदोलनाला कोल्हापूर गॅझेट, पेन, कायद्याच्या पुस्तकाचे पूजन करून सुरुवात झाली यावेळी ते बोलत होते.
यावेळी त्यांनी खंडेनवमीच्या निमित्ताने राज्यघटना आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी १९०२ मध्ये काढलेला आदेश प्रमाण मानून यापुढे मराठा आरक्षणाचा लढा करायचा आहे. यासाठीच सातत्याने प्रयत्न करूया असा निर्धार व्यक्त केला. कार्यक्रमाला ज्येष्ठ इतिहास संशोधक प्रा. डॉ. जयसिंगराव पवार, मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती तानाजी नलवडे, व्ही. बी. पाटील, दिलीप देसाई, बाबा इंदुलकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
शाहू छत्रपती म्हणाले, आज आपण वेगळ्या पद्धतीने खंडेनवमी साजरी करत आहोत. परंपरेनुसार शस्त्रांचे पूजन करायचे असते. भारताने लोकशाही स्वीकारली असून आपल्याला त्याच रस्त्याचे जायचे आहे. मराठा आरक्षणाच्या बाबतीत संविधानामध्ये जे अडथळे आहेत ते दूर करावे लागतील तरच आरक्षणाचा प्रश्न सुटेल. मराठा समाज अनेक पातळ्यांवर मागासलेला आहे हे सिद्ध झाले आहे तसेच मराठा व कुणबी हे एकच आहेत हे मी गेले दोन वर्षे सांगत आहे. मराठा समाजाला आरक्षण देताना अन्य समाजावर अन्याय होऊ नये.
मराठा समाजाला नेमके काय मिळाले?
शाहू छत्रपती म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे-पाटील यांनी सरकारसोबत बैठका घेतल्या. मात्र, सरकारकडून हा प्रश्न सुटलेला नाही. आतापर्यंत पुष्कळ प्रयत्न झाले आहेत, प्रत्यक्षात मराठा समाजाला काय मिळाले आणि किती मिळाले याचा अंदाज नाही. मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे यात शंका नाही. मराठा समाज मोठा आहे त्यामुळे त्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे.