Kolhapur Crime: चक्कर येऊन पडताच कारागिराची चांदीची पिशवी चोरट्याकडून लंपास, सात लाखांच्या ९८ मूर्तींची चोरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2025 11:58 IST2025-10-06T11:56:45+5:302025-10-06T11:58:44+5:30
१० दिवसांनी फिर्याद नोंद

संग्रहित छाया
Kolhapur Crime: भेंडे गल्ली येथील सराफांना चांदीच्या मूर्ती देण्यासाठी जाताना जुना वाशी नाका येथे रंकाळ्याजवळ चक्कर येऊन पडताच कारागिराच्या मोपेडवरील ९८ मूर्ती असलेली पिशवी चोरट्याने लंपास केली. हा प्रकार २४ सप्टेंबर रोजी दुपारी सव्वाबाराच्या सुमारास घडला. याबाबत कारागीर सर्जेराव विठ्ठल लव्हटे (वय ३६, रा. बोंद्रेनगर, कोल्हापूर) यांनी शनिवारी (दि. ४) जुना राजवाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
जुना राजवाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भेंडे गल्ली येथील एका सराफाने कारागीर लव्हटे यांना गणपती आणि लक्ष्मीच्या लहान-मोठ्या आकाराच्या चांदीच्या ९८ मूर्ती तयार करण्याची ऑर्डर दिली होती. तयार झालेल्या सर्व मूर्ती कापडी पिशवीत घेऊन त्या पोहोच करण्यासाठी २४ सप्टेंबरला दुपारी ते घरातून बाहेर पडले. क्रशर चौकापासून पुढे गेल्यावर त्यांना अस्वस्थ वाटू लागले.
मोपेड चालवतानाच त्यांना जुना वाशी नाक्याजवळ चक्कर आली. मोपेडची गती कमी करून रस्त्याच्या कडेला थांबण्याच्या तयारीत होते. त्याचवेळी रंकाळ्याच्या लोखंडी रेलिंगला मोपेड धडकून ते पडले. त्यांना उठवण्यासाठी गर्दी जमली होती. काही वेळाने त्यांना मोपेडवरील चांदीच्या मूर्ती ठेवलेली पिशवी चोरीला गेल्याचे लक्षात आले. त्यात सात लाख १० हजार रुपये किमतीच्या गणपतीच्या ४९ आणि लक्ष्मीच्या ४९ मूर्ती होत्या.
खात्री करण्यात दहा दिवस गेले
चोरीची घटना घडल्यानंतर लव्हटे फिर्याद देण्यासाठी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गेले होते. मात्र, त्यांनी बनाव केला असावा, अशी पोलिसांना शंका आली. प्राथमिक चौकशी केल्यानंतर फिर्याद नोंदवून घेऊ, असे पोलिसांनी त्यांना सांगितले. त्यानंतर चोरी झाल्याची खात्री झाल्यानंतर पोलिसांनी फिर्याद दाखल करून घेतली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने चोरट्याचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.