विठ्ठल मंदिरात प्रदक्षिणा घालतानाच आला हृदयविकाराचा झटका, कोल्हापुरातील वारकऱ्याचा जागीच मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2023 19:09 IST2023-02-03T19:08:42+5:302023-02-03T19:09:40+5:30
गेल्या अनेक वर्षांपासून ते माघ वारीला पंढरपूरला पायी जात होते

विठ्ठल मंदिरात प्रदक्षिणा घालतानाच आला हृदयविकाराचा झटका, कोल्हापुरातील वारकऱ्याचा जागीच मृत्यू
कसबा तारळे तुरंबे : चक्रेश्वरवाडी (ता. राधानगरी) येथील सदाशिव महादेव बारड (वय ५५) यांचे पंढरपुरात एकादशीदिवशी मंदिराची प्रदक्षिणा घालत असताना हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. सदाशिव बारड हे विठ्ठल भक्त होते.
गेल्या अनेक वर्षांपासून ते माघ वारीला पंढरपूरला पायी जात होते. यावर्षी ते शनिवार (दि. २८) जानेवारीला पंढरपूरला गेले होते. पंढरपुरात गेल्यापासून नित्यनेमाने दर्शन, पूजा व प्रदक्षिणा हा त्यांचा नित्यक्रम ठरला होता.
बुधवारी सकाळी एकादशीदिवशी सदाशिव बारड यांना मंदिराची प्रदक्षिणा घालत असताना हृदयविकाराचा तीव्र धक्का आला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांना तात्काळ पंढरपूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. बुधवारी रात्री उशिरा चक्रेश्वरवाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सून, नातवंडे असा परिवार आहे.