Kolhapur: ‘गोकुळ’कडे ५०० कोटींच्या ठेवी असताना डिबेंचर कपातीची गरज काय?, दूध संस्थांचा सवाल; उपोषणाचा दिला इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 17:57 IST2025-10-09T17:57:21+5:302025-10-09T17:57:41+5:30
दुग्ध विभागाकडे दाद मागणार

Kolhapur: ‘गोकुळ’कडे ५०० कोटींच्या ठेवी असताना डिबेंचर कपातीची गरज काय?, दूध संस्थांचा सवाल; उपोषणाचा दिला इशारा
कोल्हापूर : ‘गोकुळ’ दूध संघाकडे ५०० कोटींच्या ठेवी असताना डिबेंचर कपातीची गरज काय? असा सवाल करत संघाच्या या धोरणामुळे दूध संस्था अडचणीत सापडल्या असून याबाबत दुग्ध विभागाकडे दाद मागणार असल्याची माहिती दूध संस्था प्रतिनिधींनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.
भैरवनाथ दूध संस्था गंगापूरचे अमरसिंह पाटील म्हणाले, दूध दर फरक जेवढा जाहीर केला त्यातील निम्याहून अधिक रक्कम कपात करून घेतली. दूध उत्पादक आमच्याकडे पैसे मागत आहे, त्यांना द्यायचे कुठून? ‘गोकुळ’ दूध संघ सक्षम असल्याचा डांगोरा नेतेमंडळी पिटत आहेत, मग दूध संस्थांकडून पैसे कपात करण्याची वेळ का आली? याचे उत्तर त्यांनी द्यावे.
संजय मगदूम म्हणाले, गेल्या दहा वर्षांत यंदा सर्वाधिक डिबेंचर कपात केली आहे. माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळ असताना सलग तीन वर्षे डिबेंचर कपात करण्यात आली नव्हती. मग, याच संचालक मंडळाला एवढ्या निधीची गरज का भासते? असा सवाल करत उद्या, शुक्रवारपर्यंत कपात केेलेली रक्कम परत करा अन्यथा संघाच्या दारात उपोषणाला बसून मोर्चा काढू, असा इशारा दूध संस्था प्रतिनिधींनी दिला. यावेळी, ‘गोकुळ’चे माजी संचालक विश्वास पाटील, गडमुडशिंगीचे उपसरपंच तानाजी पाटील आदी उपस्थित होते.
कागदी घोडे नाचवू नका..
डिबेंचर कपातीबाबत संघाचे कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले यांना शिष्टमंडळाने भेटून संस्थांना पैसे परत करण्याची मागणी केली होती. पण, त्यांनी कागदी घोडे नाचवून खुलासा केल्याचे संस्था प्रतिनिधींनी सांगितले.
..अन्यथा उद्या ‘गोकुळ’च्या दारात उपोषण, दूध उत्पादक संघटनेचा इशारा
कोल्हापूर : ‘गोकुळ’ने दूध फरकातून डिबेंचरपोटी मोठ्या प्रमाणात रक्कम कपात केल्याने दूध उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. कपात केलेली रक्कम परत करा अन्यथा उद्या, शुक्रवारी संघाच्या ताराबाई पार्क कार्यालयाच्या दारात उपोषणाला बसू, असा इशारा कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघटनेने बुधवारी पत्रकार परिषदेत दिला.
संघटनेचे अध्यक्ष जोतिराम घोडके म्हणाले, ‘गोकुळ’ने दिवाळीच्या पार्श्वभूमीवर दूध दर फरकापोटी १३६ कोटी दिल्याचे जाहीर केले; पण प्रत्यक्षात संस्थांच्या खात्यावर ही रक्कम आलीच नाही. यातून डिबेंचरपोटी रक्कम कपात करून घेतली आहे. डिबेंचर कपातीला आमचा विरोध नाही; पण प्रतिलिटर १.२५ रुपयांप्रमाणे कपात केल्याने संस्था अडचणीत आल्या आहेत.
शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष ॲड. माणिक शिंदे म्हणाले, नैसर्गिक संकटाने शेतकरी अगोदरच अडचणीत सापडला आहे. अशा वातावरणात त्याच्या पदरात चार पैसे जादा दूध दर फरक देऊन त्याला आधार देण्याची भूमिका दूध संघाने घेणे अपेक्षित होते; पण कोणालाही विश्वासात न घेता मोठ्या प्रमाणात कपात केल्याने दूध उत्पादकाच्या पदरात दिवाळीत काहीच पडणार नाही. त्यामुळे दिवाळीपूर्वी संस्थांच्या खात्यावर पैसे वर्ग करावेत. यावेळी, बाळासाहेब पाटील, युवराज शेलार आदी उपस्थित होते.