कुंभोजमध्ये महाविकास आघाडीची वाट बिकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:24 IST2021-01-20T04:24:15+5:302021-01-20T04:24:15+5:30

अशोक खाडे कुंभोज : येथील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सोळा जागांसाठी चार ...

Waiting for Mahavikas Aghadi in Kumbhoj is difficult | कुंभोजमध्ये महाविकास आघाडीची वाट बिकट

कुंभोजमध्ये महाविकास आघाडीची वाट बिकट

अशोक खाडे

कुंभोज : येथील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सोळा जागांसाठी चार प्रभागात दोन आघाड्यादरम्यान तर दोन ठिकाणी अपक्षातच रंगलेल्या चुरशीच्या लढतीत महाविकास आघाडीस सात तर लोकविकास आघाडीस चार जागा मिळाल्या. अपक्षांनी पाच जागा जिंकल्या. स्वत:कडील एका बिनविरोध जागेसह दोन अपक्ष उमेदवारांच्या पाठिंब्यावर महाविकास आघाडीचे सत्ता स्थापनेचे गणित जुळत असतानाच लोकविकास आघाडीनेही बिनविरोध जागेवर दावा सांगितला आहे. चार अपक्षांचे पाठबळ गृहित धरून सत्तास्थापनेसाठी लोकविकास आघाडीने बाह्या सरसावल्याने महाविकास आघाडीची सत्ता स्थापनेची वाट थोडी बिकट बनली आहे.

काॅंगेस, शिवसेना तसेच स्वाभिमानी प्रणित किरण माळी, बाबासाहेब चौगुले,प्रकाश पाटील, सत्यजित तोरस्कर यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचा भाजपा,जनसुराज्य तसेच जय शिवराय किसान संघटना प्रणित अरूण पाटील,बापूसो पाटील, सदाशिव कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखालील लोकविकास आघाडीशी प्रभाग एक व पाचमध्ये सामना झाला. प्रभाग चार व सहामध्ये अपक्ष यांच्यात रंगत आणली. लक्षवेधी लढतीत बाबासाहेब चौगुले यांचा मुलगा अनिकेत चौगुले,किरण माळी यांची पत्नी शुभांगी माळी तसेच प्रकाश पाटील यांच्या भावजय अरूणादेवी पाटील यांनी बाजी मारली.

सद्यस्थितीत महाविकास आघाडीकडे दहा संख्याबळ आहे. लोकविकास आघाडीकडे तीन अपक्षांच्या पाठबळासह सात संख्याबळ आहे. बिनविरोध स्मिता चौगुले यांचे पाठबळ मिळविण्यासाठी लोकविकास आघाडीकडून शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. एकूणच या नाट्यमय घडामोडींकडे ग्रामस्थांचे लक्ष लागून राहिले आहे.

अपक्ष उमेदवार समाजाच्या आज्ञेत

सत्तास्थापनेसाठी दोन्हीं आघाड्यांकडून पाठिंब्यासाठी नेत्यांकडून अपक्षांची मनधरणी सुरु आहे. मात्र अपक्षांच्या विजयात आपापल्या समाजाचा मोलाचा वाटा असल्याने अपक्षांकडून समाज सांगेल तिकडेच अशी भूमिका घेतली जात असल्याने संबंधित उमेदवार समाजाच्या आज्ञेत असल्याचे दिसत असून यामुळे नेत्यांची कसरत होत आहे.

Web Title: Waiting for Mahavikas Aghadi in Kumbhoj is difficult