महिन्यात कोल्हापूर, सातारा, सांगलीचे व्हिजन डॉक्युमेंट, ‘केएसएसडीसी' सादर करणार १५ वर्षांचा विकास आराखडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2025 15:59 IST2025-09-29T15:57:49+5:302025-09-29T15:59:05+5:30
आमदार सतेज पाटील यांच्या पुढाकारातून आयोजित चर्चासत्रामध्ये हा निर्णय घेण्यात आला.

महिन्यात कोल्हापूर, सातारा, सांगलीचे व्हिजन डॉक्युमेंट, ‘केएसएसडीसी' सादर करणार १५ वर्षांचा विकास आराखडा
कोल्हापूर : तीन जिल्ह्यांच्या शाश्वत विकासाला दिशा देण्यासाठी ‘कोल्हापूर-सांगली-सातारा डेव्हलपमेंट कॉरिडॉर (केएसएसडीसी)’ या व्यासपीठाच्या माध्यमातून आगामी १५ वर्षांचे व्हिजन डॉक्युमेंट महिन्याभरात सरकारला सादर करणार असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय रविवारी येथे घेण्यात आला.
आमदार सतेज पाटील यांच्या पुढाकारातून आयोजित चर्चासत्रामध्ये हा निर्णय घेण्यात आला. यावेळी तीनही जिल्ह्यांत विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. नवउद्योजकांना प्रोत्साहन, उद्योग विकासातील नवीन कल्पना, ग्लोबल कॉम्पिटिटिव्ह सेंटर, स्मार्ट तंत्रज्ञानाचा वापर यांसह विविध विषयांवर सखोल चर्चा केली. यातून पश्चिम महाराष्ट्राच्या शाश्वत विकासाला चालना मिळेल, असा विश्वास या मान्यवरांनी व्यक्त केली. उद्योग, तंत्रज्ञान, कृषी, व्यवसाय, शिक्षण, संशोधन, माध्यम आदी क्षेत्रांतील १५२ तज्ज्ञ यावेळी उपस्थित होते.
सतेज पाटील म्हणाले, या तीन जिल्ह्यातील शाश्वत विकासासाठी एकाच कॉरिडॉरची संकल्पना मांडतो आहोत. त्याचे सादरीकरण सर्वपक्षीय मंत्री, आमदार आणि सरकारपुढे करू. कोल्हापूर, सांगली आणि सातारा या भाैगोलिक परिसराची सांस्कृतिक आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी एकमेकांशी जोडलेली आहे. सर्किट बेंच आणि विमानतळाची सोय झाली आहे. या तिन्ही जिल्ह्यांत दिल्लीसारखी ललित कला अकादमी व्हावी, यासाठी क्रीडा, उद्योग, कृषी क्षेत्राचा आगामी १५ वर्षांतील विकास आराखडा तयार करू.